मुंबई : रुग्णालयात रुग्ण स्ट्रेचरवर पोहोचतात हे काय कुणाला सांगायला नको. पण चक्क डॉक्टर स्ट्रेचरवरून, त्यातही पीपीई किट घालून रुग्णालयात पोहचल्याचे तुम्ही कधी ऐकले वा पाहिले आहे का? वा! असे काही घडल्याचे सांगितले तर ते तुम्हाला खरे वाटेल का? पण हे खरे आहे आणि हे घडले आहे, मुंबई महानगर पालिकेच्या नायर रुग्णालयात. बुधवारी रात्रीपासून नायर रुग्णालयाबाहेर आणि काही इमारतीमध्ये पाणी साचले होते. या पाण्यातून पीपीई किटमधील निवासी डॉक्टर कसे वॉर्डपर्यंत पोहचणार हा प्रश्न रुग्णालय प्रशासन आणि निवासी डॉक्टरांना पडला होता. त्यावर स्ट्रेचरवरून डॉक्टरांना नेण्याची 'आयडीया'पुढे आली आणि मग काय मोठी कसरत करत काही डॉक्टरांना वॉर्डपर्यंत पोहचवण्यात आले. कोविड काळात रुग्णसेवेसाठी अशा बिकट परिस्थितीत वाट काढण्याच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
नायर रुग्णालयात कधी नव्हे ते यंदा पावसाचे पाणी थेट रूग्णालयात घुसले. त्यात आजच्या घडीला नायर रुग्णालय कोविडसाठी महत्वाचे असून येथे मोठ्या संख्येने रूग्ण उपचारासाठी दाखल होताना दिसतात. येथे चांगले उपचार कोविड रुग्णांना मिळत असल्याने रुग्णांचाही कल या रुग्णालयाकडे असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच येथे मोठी कोविड ओपीडीही सुरू करण्यात आली आहे. पण बुधवारी रात्री 3 वाजल्यापासून ही ओपीडी आणि रुग्णालयाचा परिसर पाण्याखाली होता. बराच वेळ पाणी जराही ओसरलेले नाही. त्यामुळे संशयीत आणि नव्या रुग्णांचे मोठे हाल होत होते. तात्पुरती ओपीडी अपघात विभागात सुरू करण्यात आली आहे. पण रुग्णालयाच्या दारात आणि संपूर्ण मुंबईतच पाणी साचल्याने रुग्णांनाही रुग्णालयात पोहचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे आज खूपच कमी आणि ज्यांची तब्येत खूपच खालावली आहे असेच रूग्ण येत असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.