मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्फ्यू असताना पालिकेच्या स्थायी समितीची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला भाजपचे नगरसेवक गैरहजर राहिले. या बैठकीत १४४ कलमाचा भंग करून अधिकारी आणि नगरसेवक गर्दी करणार असल्याची तक्रार भाजपकडून पोलिसांकडे करण्यात आली आहे. त्यावर बोलताना १४४ कलम कुठे लागू होते, हे भाजपच्या सदस्यांना माहीत आहे का? असा सवाल करत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. भाजपवाल्यांनी फक्त टीका करत बसू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
हेही वाचा...'लॉकडाऊनसाठी केंद्राने दिरंगाई केली; पण आम्ही जनतेच्या पाठीशी उभे राहू'
जगभरात हजारो बळी घेणाऱ्या कोरोना व्हायरसचे रुग्ण मुंबईत वाढत आहेत. राज्यात कर्फ्यू लावण्यात आला आहे. अशा वेळी पालिकेच्या स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला भाजपने विरोध केला होता. ही बैठक होऊ नये म्हणून भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापौर किशोरी पेडणेकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते. त्यानंतरही बैठक रद्द न झाल्याने भाजपचे नगरसेवक अॅड. मकरंद नार्वेकर यांनी आझाद मैदान पोलीस ठाणे, पोलीस उपायुक्त यांना पत्र दिले आहे. या पत्रात या बैठकीला ५० हून अधिक अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित राहणार असल्याने हा १४४ कलमाचा भंग असल्याने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यावर बोलताना, 'ही बैठक आयुक्तांनी विनंती केल्यानुसार अत्यावश्यक प्रस्ताव मंजूर कराण्यासाठी घेण्यात आली होती. या बैठकीत नगरसवेक, चिटणीस आणि पालिकेचे अतिरिक्त आयुक्त इतक्याच लोकांना परवानगी देण्यात आली. बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले. पावसाळ्याच्या तयारीपूर्वी केली जाणारी कामे यासाठीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. मात्र, नालेसफाईचा एकही प्रस्ताव मंजूर केलेला नाही. भाजप सदस्य या बैठकीला उपस्थित नसले तरी इतर सर्व पक्षीय नगरसेवकांनी एकमताने प्रस्ताव मंजूर केले,' असे यशवंत जाधव यांनी सांगितले.