मुंबई -महापालिकेकडून महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. पालिकेने यासाठी आपल्या जेंडर बजेटमधील ४ कोटी रकमेपैकी २ कोटी ८३ लाख ७५ हजार रुपयांची तरतूद केली आहे. या बजेटमधून प्रत्येक महिला बचत गटास २ ते पंचवीस हजार रुपये खेळते भांडवल दिले जाणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर मुंबई मनपाची आर्थिक खेळी, महिला बचत गटांना करणार पावणेतीन कोटींचे आर्थिक सहाय्य - बचत गट
मुंबई महापालिका जेंडर बजेटमधून प्रत्येक महिला बचत गटास २ ते पंचवीस हजार रुपये खेळते भांडवल देणार आहे.
पालिकेच्या २०१९-२० या अर्थसंकल्पातील जेंडर बजेट अंतर्गत महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी काम करण्यात येणार आहे. महिला व बाल कल्याण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला बचत गटांना या योजनेच्या निकषास पात्र ठरावे लागणार आहे. या योजनेंतर्गत १ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या केशरी आणि पिवळे शिधापत्रिकाधारक कुटुंबातील १८ वर्षांवरील महिलांना बचत गटांत सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. तसेच बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सबलीकरण करता येण्याच्या उद्देशाने १० ते २० महिलांचा एक बचत गट स्थापन करण्यात येईल.
महिला बचत गटाने त्यांचे खाते राष्ट्रीयकृत आणि सारस्वत बँकेत उघड्ल्यानंतर ३ महिन्यांनी त्या बचत गटाला किमान २ ते अडीच हजार रुपये खेळते भांडवल देण्यात येणार आहे. यासाठी २० निकष तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार जेंडर बजेट अंतर्गत २ कोटी ८३ लाख ७५ हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ ११३५ महिला बचत गटांना होणार आहे. एखाद्या बचत गटाने गैरव्यवहार केल्यास त्यांच्याकडील खेळते भांडवल काढून घेण्यात येणार असून या बचत गटाला कायमस्वरुपी बंदी घालण्यात येणार आहे. महिला बचत गटाच्या प्रत्येक सदस्याकडे आधार कार्ड, पावती असणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान हा निधी ऐन निवडणुकीच्या तोंडावर महिला बचत गटांना दिला जाणार असल्याने यावरुन वाद होण्याची शक्यता आहे.