मुंबई - कोरोनाचा विळखा कमी करण्याच्या आणि निदान लवकर होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने अखेर महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता कोरोनाची लक्षणं असणाऱ्यांना चाचणीसाठी कोणत्याही प्रिस्क्रिप्शनची गरज लागणार नाहीय. उद्यापासून कोरोना संशयित रुग्णांना पालिकेच्या ओपीडीत किंवा खासगी लॅबमध्ये चाचणी करता येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.
यापुढे कोरोना चाचणीसाठी 'डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन'ची गरज नाही ; पालिकेचा मोठा निर्णय
कोरोनाचा विळखा कमी करण्याच्या आणि निदान लवकर होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने अखेर महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता कोरोनाची लक्षणं असणाऱ्यांना चाचणीसाठी कोणत्याही प्रिस्क्रिप्शनची गरज लागणार नाहीय.
आतापर्यंत लक्षणे असलेल्या संशयितांची कोरोना चाचणी होते. यासाठी देखील डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज भासते. तसेच लक्षणे नसल्यास चाचणी होत नाही. चाचणी किट कमी असल्याने तसेच ज्यांना गरज आहे, त्यांचीच चाचणी व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता. ई-प्रिस्क्रिप्शन द्वारे देखील कोरोना चाचणी होत होती.
मात्र, रुग्णालयातून प्रिस्क्रिप्शन आणण्यासाठी मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यातही अनेक जण लक्षणं असताना ही भीतीने डॉक्टरांकडे जात नाहीत. या बाबी लक्षात घेत चाचणी वेळेत होण्याची गरज असल्याने पालिकेने संबंधित निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रिस्क्रिप्शन न घेता कोरोना चाचणीची परवानगी देण्यात आलीय. मात्र कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांनाच हा नियम लागू आहे. लक्षणं नसल्यास चाचणी होणार नाही, असे अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले.
या नव्या निर्णयाची अंमलबजावणी उद्या (8 जुलै) पासून होईल. तर प्रत्येक पालिका रुग्णालयातील ओपीडीमध्ये स्वॅब क्लेक्शनची व्यवस्था करण्यात आली आहे. तर खासगी लॅबमध्ये जाऊन अशा संशयितांना चाचणी करता येईल.