मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते. पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद होऊन मुंबई ठप्प होते. यामुळे दरवर्षी मुंबई महापालिकेवर टीका होते. आजही पाऊस पडत असल्याने मुंबईची तुंबई झाली आहे. याबाबत बोलताना मुंबईची ड्रेन लाईन म्हणजेच समुद्रात पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी असल्याने काही तासांसाठी मुंबईत पाणी तुंबणारच, असे वक्तव्य महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केले आहे.
एका तासात 100 हून अधिक मिलीमीटर पाऊस -
मुंबईमध्ये रात्रीपासून पाऊस पडत आहे. सकाळीही पाऊस पडत असल्याने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. सायन, हिंदमाता, किंग सर्कल आदी ठिकाणी नेहमीच पाणी भरते. आजही याठिकाणी पाणी साचले. याचा आढावा आयुक्त इकबाल सिंग चहल पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग येथे जाऊन घेतला. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी बोलताना 12 तासात 140 ते 160 मिली पाऊस झाला. 24 तासात 500 मिली पाऊस झाला की अतिवृष्टी म्हणतात, पण एका तासातच 100 हुन अधिक मिलिमीटर पाऊस पडल्याचे आयुक्तांनी सांगितले.
हिंदमातासाठी उपाययोजना करत आहोत ..
हिंदमातामध्ये यावेळी 4 फूट उंचीचे रोड तयार केले. यामुळे प्रथमच हिंदमाताची वाहतूक थांबली नाही. 140 कोटींचा भूमिगत प्रकल्प सुरू आहे, दीड किलोमीटरचा प्रकल्प पूर्ण व्हायला 30 दिवस लागणार, इथून पुढे हिंदमाता येथे कधीच पाणी साचणार नाही, असा दावा आयुक्तांनी केला. मे अखेरीस केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली आहे. १४० कोटींचा अंडरग्राऊंड पाईपलाईन टाकून भूमीगत टाक्यांचा प्रकल्प उभारतोय असे आयुक्तांनी सांगितले.
पाणी साचणार नाही -
सायन येथील गांधी मार्केटला मोठी पाईपलाईन टाकत आहोत. गांधी मार्केटलाही येथून पुढे पाणी साठणार नाही. अंधेरी सबवेची समस्या मोगरा पंपिंग स्टेेशन पूर्ण झाल्याशिवाय सुटणार नाही. आपल्याकडे ड्रेनची कॅरींग कपॅसिटी कमी असल्याने काही तासांसाठी मुंबईत पाणी तुंबणारच, असे आयुक्त म्हणाले. एका तासांतच ६० मिमी पाऊस झाल्याने रेल्वे ट्रॅकवर पाणी आले. दहिसर, सायन आणि चुनाभट्टी वगळता रेल्वे ट्रॅकवर पाणी तुंबलेले नाही, असे आयुक्तांनी सांगितले.