मुंबई - माझगाव येथील जीएसटी भवनला सोमवारी दुपारी आग लागली. तब्बल तीन तासांनी या आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले. या आगीत इमारतीमधील तीन मजले जळून खाक झाले आहेत. कोणाचा तरी फायदा व्हावा, यासाठी ही आग लावण्यात आली का? असा संशय काही नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आगीमध्ये महत्वाच्या फायली जळाल्याचा संशय असल्याने त्याची एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी मुंबई पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे. तसेच इमारतीचा दहावा मजला अधिकृत होता की अनधिकृत होता, याची माहिती महापालिकेकडे नाही. ती माहिती पालिकेने समोर आणायला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
मुंबई महापालिकेचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांची प्रतिक्रिया... हेही वाचा...माझगाव जीएसटी भवनला लागलेली आग आटोक्यात; उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी
माझगाव येथील जीएसटी भवनला सोमवारी दुपारी आग लागली. नऊ मजली असलेल्या या इमारतीवर दहावा मजला बांधण्यात आला होता. इमारतीचे नूतनीकरणही सुरू होते. त्याचवेळी इमारतीला आग लागली आहे. या आगीमुळे संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत बोलताना यावर्षी जीएसटीची वसुली कमी प्रमाणात झाली आहे. त्यामध्ये काही लोकांची चौकशी सुरु असून त्यांची कागदपत्रे आगीत जाळण्यात आली आहेत, असा आरोप रवी राजा यांनी केला. आगीमध्ये कॉम्पुटर आणि इतर कागदपत्रे जळाली आहेत. याच फायदा कोणाला होणार आहे. यावरून संशय निर्माण होत असल्याने एसआयटी चौकशी करण्याची गरज आहे. ही चौकशी लवकर पूर्ण करून त्याचा अहवाल लवकरात लवकर समोर आला पाहिजे, अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.
हेही वाचा...'...तर देवेंद्र फडणवीसांनी 'या' विक्रमाची बरोबरी केली असती'
जीएसटी भवन हे महत्वाचे कार्यालय आहे. या इमारतीला आग कशी लागली, ती आग कशामुळे लागली, यावरून संशय निर्माण होत आहे. या आगीबाबत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 'गेल्या आठवड्यापासून मुंबईत आगीचे प्रमाण वाढले आहे. मुंबई जागतिक दर्जाचे शहर आहे. त्यात गेल्या वर्षात ४५०० आगीच्या घटना नोंद झाल्या असून त्यात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाने याबाबत गंभीरतेने आपली जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे' असे मत रवी राजा यांनी व्यक्त केले.
या इमारतीमध्ये आग लागली त्याठिकाणी जीएसटी आयुक्त यांचे कार्यालय आहे. महत्वपूर्ण कागदपत्रे त्याठिकाणी होती. त्याठिकाणी आग लागणे ही गंभीर बाब असल्याने त्याची चौकशी करून अहवाल सादर केला पाहिजे, असे रवी राजा म्हणाले. इमारतीचा दहावा मजला अधिकृत होता की अनधिकृत होता याची माहिती पालिकेकडे नाही. ती माहिती पालिकेने समोर आणायला पाहिजे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
काय आहे जीएसटी भवन ?
मुंबईच्या माझगाव येथे जीएसटी भवन आहे. काही वर्षांपूर्वी ते व्हॅट भवन होते, त्यानंतर आता जीएसटी भवन म्हणून ओळखले जाते. जीएसटी भवनच्या दोन इमारती असून त्यातील एक इमारत १९६५ ला दुसरी १९७२ ला बांधण्यात आली होती. तळ अधिक नऊ मजली असलेल्या इमारतीच्या नवव्या मजल्यावर शनिवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान आग लागली. या आगीवर सुमारे तीन तासानंतर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले. इमारतीच्या नवव्या मजल्यावरील कार्यालये नूतनीकरण केली जात होती. त्याजागी जुने लाकडी सामान असेच ठेवण्यात आले होते. शॉर्टसर्किटने आग लागल्यावर जुन्या लाकडी सामानाने पेट घेऊन आग भडकल्याचे समोर आले आहे. याच दरम्यान इमारतीचा दहावा मजला चर्चेचा विषय बनला आहे. इमारतीच्या दहाव्या मजल्याचा भार इमारतीवर पडत असल्याचे व्हीजेटीआय या संस्थेकडून करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये म्हटले आहे.