मुंबई : मुंबई पोलीस (Mumbai police) विविध कारणांमुळे चर्चेत असतात. सध्या मुंबई पोलीस चर्चेत आहेत ते नव्याने स्थापन झालेल्या निर्भया पथकामुळे. यात मालाड पोलिसांच्या निर्भया पथकाची केलेल्या कामगिरीमुळे त्यांची चर्चा होत आहे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने निर्भया पथकाचे नेतृत्व करणाऱ्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रितल परुळे यांच्याशी केलेली बातचीत...
हेही वाचा -महिला दिन विशेष : महिला दिनावर बोलू काही...
अल्पवयीन मुलीने सोडलं घर
परुळे सांगतात, "आम्हाला एक अल्पवयीन मुलगी रात्री पेट्रोलिंग वेळी रस्त्यावरून चालताना दिसली. आम्ही तिला गाडीत बसवलं व ठाण्यात आणलं. तिची चौकशी केली असता लक्षात आलं तिला घरी अभ्यास करायला सांगितल्याने घरच्यांशी भांडण झालं होतं. त्यामुळे रागात ती जीव देण्यासाठी बाहेर पडली. तीच समुपदेशन करून आम्ही तिला पालकांकडे नेले."
हद्दीचा विचार न करता महिलांना मदत
पोलीस त्यांच्या हद्दीच्या मर्यादेमुळे नेहमीच टीकेचे विषय ठरत असतात. मात्र, मालाडचे निर्भया पथक महिलांसाठी हद्दीचा विचार न करता मदत करते. परुळे सांगतात, "चारकोप परिसरात एक 4 ते 5 वर्षाची छोटी मुलगी आढळून आली. आम्ही घटनेचं गांभीर्य ओळखून हद्दीचा विचार न करता घटना स्थळी दाखल झालो. मुलीला ताब्यात घेतलं, तिची चौकशी केली व तिला पालकांच्या हवाली केले." या पथकाच्या कामाची दखल घेत मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रितल परुळे व त्यांच्या संपूर्ण टीमचा सत्कार करण्यात आला.