महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कंगनाला नुकसान भरपाई मिळणार -उच्च न्यायालयाचा महापालिकेला दणका - कंगणा राणौत कार्यालय तोडक कारवाई

अभिनेत्री कंगना राणौतला नुकसानभरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यासाठी समिती नेमून झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

mumbai high court ordered to give compensation to kangana
कंगनाला मिळणार नुकसानभरपाई; कार्यालयावरील तोडक कारवाई प्रकरणी उच्च न्यायालयाचा महापालिकेला दणका

By

Published : Nov 27, 2020, 11:41 AM IST

Updated : Nov 27, 2020, 3:44 PM IST

मुंबई - महापालिकेने कंगना रणौत यांच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईविरुद्धच्या याचिकेवर आज 27 नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालय निकाल दिला आहे. अभिनेत्री कंगना राणौतला नुकसानभरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यासोबतच मुंबई महानगरपालिकेकडून अभिनेत्री कंगना राणौतवर लावण्यात आलेले आरोप काढून टाकण्याचे सांगण्यात आले. तोडक कारवाईदरम्यान झालेल्या नुकसानीचे मोजमाप करण्यासाठी एका निरीक्षकाची नेमणूक करावी, असे आदेश दिले आहेत. नेमण्यात आलेल्या निरीक्षकाचा अहवाल हा मुंबई उच्च न्यायालयात मार्च 2021 पर्यंत सादर करण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाच्या बाजूने निकाल देत असताना कंगना राणौतला तिच्या कार्यालयामध्ये जर इतर बांधकाम करायचे असेल तर रीतसर परवानगी घेऊनच बांधकाम करावे, असे निर्देश दिले आहेत.

याचा फायदा इतर मुंबईकरांनाही -किशोरी पेडणेकर

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, की कंगना रानौत प्रकरणी जो कोर्टाने निर्णय दिला आहे त्याची अद्याप कॉपी आलेली नाही. कॉपी आल्यावर त्यावर विचार विनिमय होईल. 354 (अ) ची नोटीस पहिल्यांदा दिलेली नाही याआधीही नोटीस दिल्या आहेत. ती प्रकरणेही कोर्टात गेली आहेत. त्यावेळी कोर्टाने पालिका नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश दिले होते. एका नटीच्या प्रकरणात असे वेगळे निर्णय देण्यात आले असतील तर त्याचा फायदा इतर मुंबईकरांनाही होईल. पालिकेचे लीगल डिपार्टमेंट आणि आयुक्त पुढे काय करायचे यावर निर्णय घेतील. काही लोकांनी कोर्टालाही राजकीय आखाडा बनवला आहे.

कायद्यावर माझा विश्वास , हा लोकशाहीचा विजय- कंगना

मुंबई महानगरपालिकेचे विरोधात 2 कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री कंगना राणावत हिच्या बाजूने निकाल दिल्यावर यावर अभिनेत्री कंगना राणावत हिने समाधान व्यक्त केलेला आहे. कंगना म्हणाली, की माझा पूर्वीपासूनच कायद्यावर विश्वास होता आणि हा लोकशाहीचा विजय असल्याचं कंगना राणावत हिने म्हटले ल आहे . या बरोबरच ही याचिका दाखल केल्यानंतर ज्या लोकांनी माझी खिल्ली उडवली होती त्यांची मी आभारी असून ज्या लोकांनी माझ्या विरोधात जाऊन वक्तव्य केली होती अशा लोकांमुळेच माझा लढा देण्याचा आत्मविश्वास आणखीन वाढला असल्याचं अभिनेत्री कंगना राणावत हिने म्हटलेला आहे.

कंगनाला मिळणार नुकसानभरपाई...

काय आहे प्रकरण -

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या मुंबईतील पाली हिल स्थित कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने अतिक्रमण संदर्भात कारवाई केली होती. याविरोधात कंगनाने मुंबई महानगरपालिकेकडे दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी झाली. मुंबई महानगरपालिकेतून या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करताना म्हणण्यात आले होते की कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई योग्य असून तिने दाखल केलेली याचिका ही फेटाळून लावण्यात यावी. कंगनाने मागितलेली नुकसान भरपाई म्हणजे कायद्यासोबत झालेले गैरवर्तन असल्याचही मुंबई महानगरपालिकेने म्हटले होते.

पालिकेने काय म्हटले होते -

मुंबई महानगरपालिकेचे वकील ज्वेल कार्लोस यांनी महानगरपालिकेतर्फे युक्तिवाद करताना मुंबई उच्च न्यायालयात म्हटलं होतं की कंगनाने केलेले आरोप हे चुकीचे असून तिच्या कार्यालयात करण्यात आलेली कारवाई ही कायद्याच्या चौकटीत राहून करण्यात आली आहे. सदरच्या कार्यालयाचे रुटीन निरीक्षण करत असताना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या कार्यालयांमध्ये अनधिकृतपणे बांधकाम झाल्याचे आढळले होते. यामुळे कंगनाला रीतसर नोटीस देऊन हे बांधकाम पाडण्यात आले आहे. या इमारतीच्या पार्किंगच्या जागेत टॉयलेट बनवण्यात आले होते आणि टॉयलेटच्या ठिकाणी किचन बनवण्यात आले होते, अशी मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबई उच्च न्यायालयाला माहिती देण्यात आलेली आहे.

सूडबुद्धीने कारवाई केल्याचा कंगनाचा दावा -

अभिनेत्री कंगनाने तिच्या वकिलांकडून न्यायालयात काही पुरावे सादर केले होते. कंगनाने सोशल मीडियावर काही विषयांवर टीकाटिप्पणी केल्यानंतर यासंदर्भात तिला पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, बॉलिवूडमधला फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यालाही अशाच प्रकारची नोटीस बजावल्यानंतर त्याला नोटीसला उत्तर देण्यासाठी एक महिन्याचा वेळ देण्यात आला होता. मात्र, कंगनाला देण्यात आलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी केवळ 24 तासांचा अवधी दिल्यामुळे ही कारवाई सुडबुद्धीने झाल्याचा दावा अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई उच्च न्यायालयात केला होता.

२ कोटींचा नुकसानभरपाईचा दावा

महापालिकेने तोडक कारवाई केल्यानंतर कंगणाने ही कारवाई बेकायदा असल्याचे सांगत नुकसानभरपाई मागितली होती. तिने महानगरपालिकेकडून २ कोटींची मागणी केली होती. तर, कंगनाने कार्यालय रहिवासी भागात येत असल्याने आणि चुकीच्या पद्धतीने नुतनीकरण करून बांधले असल्याचा ठपका महापालिकेने ठेवला होता.

भाजप नेत्याकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी स्वागत केले आहे. शिवाय आता मुंबईच्या महापौर आणि पालिका आयुक्तांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांनी आपल्या खिशातून पैसा भरावा - अतुल भातखळकर

कंगना रणौतच्या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला जोरदार थप्पड लगावली आहे. कंगना रणौतचे घर पाडणे ही सूडबुद्धीने केलेली कारवाई केली होती. तिला नुकसानभरपाई देण्याबाबतही उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. केवळ राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन मुंबई महानगरपालिकेने कंगनावर कारवाई केली होती. त्यामुळे कंगनाला देण्यात येणारी जी नुकसानभरपाई आहे, शिवाय तिच्या प्रकरणासाठी न्यायालयीन खर्च जो आला आहे त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. हा एकूण पैसा जनतेच्या खिशातून न भरता मुख्यमंत्र्यांनी आपल्या खिशातून भरावा अशी मागणी भातखळकरांनी यावेळी केली.

Last Updated : Nov 27, 2020, 3:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details