मुंबई -गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Minister Jitendra Awhad ) यांना मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) मोठा दिलासा दिला आहे. अनंत करमुसे यांना अपहरण व मारहाण प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत ( CBI ) करण्यात यावा, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मंगळवारी (दि. 26 एप्रिल) या याचिकेवर सुनावणी झाली असून मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे. पी.बी. वारले आणि ए.एम. मोडक या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
अनंत करमुसे ( Anant Karmuse ) यांनीच या प्रकरणाच्या चौकशी सीबीआयच्या माध्यमातून करण्याची मागणी केली होती. करमुसे यांचे अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी घटना घडल्यानंतर सव्वा वर्षांनंतर म्हणजेच 14 ऑक्टोबर, 2021 रोजी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका झाली. पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनीच या अटकेसंदर्भातील माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.