मुंबई:काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधातील मानहानी याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनवणी दरम्यान दोन्हीही पक्षकारांकडून कोणीही उपस्थित नसल्याने या याचिकेवर पुढील सुनावणी करिता तारीख देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी 28 जुलै पर्यंत सुनावणी तहकूब केली आहे. तसेच 28 जुलै पर्यंत राहुल गांधींना दिलेला दिलासा कायम ठेवत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये असे निर्देश गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाला देण्यात आले आहेत. राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप कार्यकर्त्याने गिरगाव न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती.
हजर राहण्याचे आदेश : तक्रारी नंतर गिरगाव न्यायालयाने राहुल गांधी यांना समन्स बजावत प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात राहुल यांनी हायकोर्टात धाव घेतली. महेश श्रीमल यांनी मानहानीची तक्रार केली आहे. ही तक्रार रद्द करण्यात यावी अशी मागणी करणारा अर्ज राहुल गांधी यांनी वकिलामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला आहे. राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका केल्याच्या आरोप करत राहुल गांधींविरोधात मुंबईत साल 2019 मध्ये मानहानीचा खटला दाखल झाला. या दाव्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिलेले आहेत.
वादग्रस्त टीका केल्याचा आरोप:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका केल्या प्रकरणातील दाव्यावर फौजदारी कारवाई सुरु करण्याचे आदेश गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिले होते. याप्रकरणी दाखल झालेली तक्रार रद्द करण्यासाठी राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर या पुर्वीची सुनावणी झाली त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलासा देत पुढील सुनावणी तहकूब केली होती.