मुंबई - शहरात आज रात्री अचानक गॅस गळती झाल्याचे निदर्शनास आले. मुख्य शहर व उपनगरातील अनेक ठिकाणांहून अग्निशमन दलाकडे गॅस गळतीच्या तक्रारी येत आहेत. याबाबत मुंबई अग्निशमन दलासह सर्व गॅस कंपन्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गॅस गळती नेमकी कुठे झाली याचा शोध अद्याप लागलेला नसून, नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे.
चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, चांदीवाली, पवई, घाटकोपर, अंधेरी, बोरिवली नॅशनल पार्क आदी परिसरातील हवेत गॅसचा दुर्गंध येऊ लागल्याने नागरिकांनी मुंबई पोलीस तसेच अग्निशमन दलाकडे तक्रार केली. त्यानुसार अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या विविध ठिकाणी पाठवून माहिती घेण्यात येत आहे. गॅस गळती झाल्याने महानगर गॅस तसेच इतर गॅस कंपन्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.