मुंबई -मुंबईमध्ये मे महिन्यापासून पुन्हा कोरोना विषाणूचा प्रसार पुन्हा सुरु झाला आहे. त्या अनुषंगाने पालिकेच्या आरोग्य विभागाने जिनोम सिक्वेन्सिंगच्या १२ व्या फेरीतील चाचण्या केल्या. यात मुंबईमधील २०२ नमुन्यांपैकी ९९.५ टक्के अर्थात २०१ नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या व्हेरियंटने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. बीए ४ चे तीन आणि बीए ५ व्हेरीयटंचा १ असे ४ रुग्ण आढळून आले आहेत. तर एक नमुना हा 'डेल्टा' या व्हेरियंटने बाधित आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे देण्यात आली ( 95 Percent Omicron Cases In Mumbai ) आहे.
जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या -मुंबईमध्ये कोणत्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यावर उपाय करणे त्वरित शक्य व्हावे यासाठी मुंबई महानगरपालिकेद्वारे ऑगस्ट २०२१ पासून जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या नियमितपणे व फेरीनिहाय करण्यात येत आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत असलेल्या या कार्यवाही अंतर्गत १२ फेरीदरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष नुकतेच जाहिर करण्यात आले आहेत. १२ व्या फेरीतील चाचण्यांसाठी २७९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २०२ नमुने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील होते, तर उर्वरित नमुने हे बृहन्मुंबई मनपा क्षेत्राबाहेरील होते. यामुळे २०२ चाचण्यांचा निष्कर्ष जाहीर करण्यात आला आहे.
४४ टक्के २१ ते ४० वयोगटातील -चाचणी करण्यात आलेल्या २०२ रुग्णांपैकी ४४ टक्के अर्थात ८८ रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटातील आहेत. तर ४१ ते ६० या वयोगटात देखील २६ टक्के म्हणजेच ५२ एवढेच रुग्ण आहेत. १६ टक्के म्हणजेच ३२ रुग्ण हे ६१ ते ८० या वयोगटातील आहेत. १२ टक्के म्हणजेच २४ रुग्ण हे '० ते २०' या वयोगटातील; तर २ टक्के म्हणजे ५ रुग्ण हे ८१ ते १०० या वयोगटातील आहेत.
२४ लहान मुलांनाही बाधा -चाचण्या करण्यात आलेल्या २०२ नमुन्यांमध्ये ० ते १८ या वयोगटातील २४ नमुन्यांचा समावेश होता. ज्यापैकी, १ नमुना हा ० ते ५ वर्षे या वयोगटातील, १० नमुने ६ ते १२ वर्षे या वयोगटातील; तर १३ नमुने १३ ते १८ वर्षे या वयोगटातील होते. हे सर्व नमुने ‘ओमायक्रॉन’ या कोविड विषाणुच्या उपप्रकाराने बाधित असल्याचे आढळून आले. या रुग्णांना कोविड बाधा झाल्याची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत.