मुंबई - कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या निषेधार्थ मुंबई कॉंग्रेसतर्फे सलग चौथ्या दिवशी निदर्शने सुरु आहेत. आज दक्षिण मुंबईतील हँगिंग गार्डन पासून राजभवनपर्यंत काँग्रेसने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ( Mumbai Congress Morcha at Raj Bhavan area in Mumbai ) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मुंबई शहराध्यक्ष भाई जगताप यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सामील झाले होते.
कारवाई सूडबुद्धीने - या प्रसंगी बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी तसेच गांधी परिवार यांच्यावर मोदी सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे. त्याचबरोबर ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये पोलिसांना पाठवून लाठीचार्ज करणे, तटबंदी करणे, तसेच हुकूमशाही व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे. याचा तीव्र निषेध म्हणून हे आंदोलन होत आहे.
हम झुकेंगे नही, डरेंगे नही, हम लढेंगे - याप्रसंगी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देशात २०१४ पासून आणीबाणी सुरू झाली आहे. मागील ८ वर्षात देशाला मान खाली घालण्यासाठी ठरवून उपाययोजना करण्यात आली आहे. आज रुपया कधी नव्हे इतका खाली घसरला आहे. भारताला इतर देशांची माफी मागावी लागत आहे. परंतु या परिस्थितीमध्ये सुद्धा केंद्र सरकारशी दोन हात करून जनतेचे प्रश्न मांडले म्हणून राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. परंतु त्यांनी सांगितले आहे, हम झुकेंगे नही, डरेंगे नही, हम लढेंगे. आज राज्यपाल भवनावर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. लोकशाही सोडून हुकूमशाही देशात सुरू आहे. इंग्रज कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस ब्रिटिशांशी लढली व आता काँग्रेस मोदी विरोधात लढत आहे. ही लढाई रस्त्यावर लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे केंद्रीय तपास यंत्रणा कोणाच्या इशाऱ्यावर काम करते याचा पुरावा द्यायची गरज नाही. सत्तेची गर्मी व गुर्मी भाजपला झाली आहे. राज्यातील नेते बोलतात ईडी उद्या लागेल व लागते, असं सांगत ही सुड भावनेच्या पोटी जाणीवपूर्वक कारवाई केली जात आहे, असे नाना पटोले म्हणाले.