मुंबई: मोठ्या प्रमाणावर तपासयंत्रणा सतर्क असल्याने सोने तस्करीची मुंबईत पोलखोल होत आहे. त्यामुळे तस्करांनी अन्य देशांच्या सीमांच्या आधारे भारतात तस्करी सुरू केली आहे. अन्य भागातून छुप्या मार्गाने सोने मुंबईत आले व त्यानंतर ते देशात वितरित केले गेल्याची गुप्त माहिती डीआरआयला (DRI) मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे तीन ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यात आले. त्यात मोठा प्रमाणावर मुद्देमाल हस्तगत करण्यात डीआरआयला यश आले आहे.
गुप्त माहितीच्या आधारावर डीआरआयने ऑपरेशन गोल्ड रश (Operation Gold Rush) सुरू केले होते. या अंतर्गत मुंबई, पाटणा आणि दिल्ली येथे ६५.४६ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. ही अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या कारवाईंपैकी एक आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे 33 कोटी असल्याचे सांगितले जात आहे.
त्यानुसार भिवंडी येथे छापा टाकण्यात आला. त्यामध्ये १०.१८ कोटी रुपये किंमतीची १९.९३ किलो वजनी १२० बिस्किटे जप्त करण्यात आली. त्या ठिकाणी संबंधितांना ताब्यात घेऊन विस्तृत चौकशी करण्यात आली असता या तस्करीचा संबंध दिल्ली, पाटणा येथे देखील असल्याचे बाहेर आले. त्यानुसार दिल्ली व पाटणा येथे छापा टाकण्यात आला. त्यामध्ये पाटण्याहून १४.५० कोटी रुपये किमतीची २८.५७ किलो वजनी १७२ तर दिल्लीहून ८.६९ कोटी रुपयांची १६.९६ किलो वजनी १०२ सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली. या सर्वांची एकूण किंमत ३३.४० कोटी रुपये आहे.
देशभरात तस्करी झालेले सोने मुंबईत येऊन येथूनच तिकडे धाडले जात असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे जप्त केलेल्या सोन्यात ३९४ सोन्याच्या कांड्या आहेत. ज्यांची ईशान्येकडील देशांतून तस्करी केली जात होती. हे सिंडिकेट मिझोराममधून देशांतर्गत कुरिअरचा वापर करत होते. डीआरआयने 'ऑपरेशन गोल्ड रश' अंतर्गत ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात पहिली कारवाई मुंबईत करण्यात आली, ज्यामध्ये २० किलो सोने जप्त करण्यात आले आहे.
दुसरी कारवाई बिहारमधील होती. ज्यात एका लॉजिस्टिक कंपनीच्या गोदामातून 172 सोन्याच्या कांड्या जप्त करण्यात आल्या. याचे वजन सुमारे २९ किलो आणि किंमत १५ कोटी आहे. तिसरी कारवाई दिल्लीत करण्यात आली आणि सुमारे ९ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. कुरिअर मार्गे सोन्याची तस्करी करणाऱ्या या संपूर्ण सिंडिकेटचा पर्दाफाश झाला आहे.