नवी मुंबई -विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव नुकताच सिडको आस्थापनाच्यावतीने पारित करून तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. ही बातमी प्रसिद्ध होताच नवी मुंबई विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांचा तीव्र रोष उमटत आहे. कामोठे ग्रामस्थ मंडळाच्यावतीने शनिवारी पत्रकार परिषद आयोजित करून त्यात विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी आग्रही भूमिका मांडण्यात आली.
प्रकल्पग्रस्त कामोठे ग्रामस्थ मंडळाची पत्रकार परिषद ग्रामस्थांचा प्राणांतिक संघर्षाचा इशारा -
शंभर हुतात्मे झाले तरीसुद्धा बेहत्तर परंतु नवी मुंबई विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे असा एल्गार ग्रामस्थ मंडळाच्यावतीने करण्यात आला. कामोठे वासियांनी प्राणांतिक आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत केला. नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा वाद यामुळे चिघळणार यात दुमत नाही. नुकतेच राज्य सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे नाव दिल्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
नामकरणासाठी प्रकल्पग्रस्तांचा एल्गार-
बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला विरोध करीत प्रकल्पग्रस्त आता एकवटले असून ज्या भूमीसाठी दि.बां.नी आपली हयात खर्ची घातली, प्रसंगी पुकारलेल्या लढ्यात ५ हुतात्मे पत्करले. त्या दिबांच्या नावाचा विमानतळ नामकरणासाठी प्रकल्पग्रस्तांनी एल्गार पुकारला असून विमानतळासाठी नाव हे दिबांचेच असले पाहिजे, यासाठी सर्व स्थरावरील लढा देण्यास प्रकल्पग्रस्त म्हणून आमचे कर्तव्य आहे.
या पत्रकार परिषदेसाठी पत्रकारांशी संवाद साधताना मंचावर जय हनुमान ग्रामस्थ मंडळ कामोठे यांची पंच कमिटी उपस्थित होती. यामध्ये सूरदास गोवारी, के. के. म्हात्रे, नगरसेवक शंकर मात्रे, नगरसेवक विजय चीपळेकर, सुधाकर पाटील, सखाराम पाटील, राजेश गायकर, भालचंद्र म्हात्रे, विजय गोवारी, जाना गोवारी, रमेश म्हात्रे, सुनील गोवारी, प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा - कोरोनाबाधित आईच्या देहाला चिताग्नी देण्यास मुलाचा नकार; मनपा अधिकाऱ्याने केले अंत्यसंस्कार