मुंबई - रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशन (आयआरसीटीसी) यांच्या वतीने मुंबई ते अहमदाबाद चालविण्यात येणारी खासगी तेजस एक्सप्रेस उद्यापासून पुन्हा धावणार आहे. ट्रेन क्रमांक 82902 / 82901अहमदाबाद - मुंबई सेंट्रल तेजस एक्स्प्रेस शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार असे आठवड्यातील चार दिवस चालणार असल्याची माहिती आयआरसीटीसीकडून देण्यात आली.
यामुळे होती तेजस एक्सप्रेस बंद-
कोरोनाच्या पार्श्वभूवीर देशात धावणार्या आयआरसीटीसीच्या तिन्ही खासगी ट्रेन सुद्धा रद्द करण्यात आलेल्या होत्या. ज्यात मुंबई- अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस, दिल्ली-लखनऊ तेजस एक्स्प्रेस आणि काशी महाकाल एक्स्प्रेसचा समावेश आहे. पण अनलॉकची सुरुवात होताच मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणारी खासगी तेजस एक्सप्रेस 17 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली होती. मात्र प्रवासी मिळत नसल्यामुळे पुन्हा एकदा खासगी तेजस बंद करण्यात आली होती. त्यानंतर 14 फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे निमित्त मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस सुरू केली होती. मात्र, आता मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आल्याने खबरदारी म्हणून मुंबईसह संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. त्यामुळे तेजस एक्स्प्रेसचे प्रवासी संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी ट्रेन क्रमांक 82902 / 82901 मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.