मुंबई - एसटी महामंडळातील कर्मचारी कोरोनासारख्या संकटाच्या काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत होते. कोरोनाकाळात कर्तव्य बजावणाऱ्या २४५ एसटी कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला. यापैकी फक्त ११ कर्मचारी ५० लाखाच्या मदतीस पात्र ठरले आहेत. मदतीपासून अजूनही अनेक कर्मचारी वंचित आहेत. महामंडळाने कर्मचाऱ्यांना व त्यांच्या वारसांना वाऱ्यावर सोडले आहे का? असा प्रश्न कांदा संघटनेकडून उपस्थित करण्यात येत आहे.
माहिती देताना श्रीरंग बरगे वारसांना नोकरी द्या-
बहुतांशी एसटी कर्मचार्यांना आर्थिक लाभ मिळाला नसताना त्यांच्या वारसांनासुद्धा अनुकंपा तत्वावरील नोकरी मिळालेल्या नाहीत. अगोदरच अनुकंपा तत्त्वाच्या नोकरीसाठी राज्यातील अनेक विभागात भली मोठी प्रतीक्षा यादी असून आता सध्याचे कर्मचारी कोरोना मुळे मृत्यू पावले त्यांच्या वारसांना अशा परिस्थितीत अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकत नाही. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा यादीवरील तसेच सध्या कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नव्याने नोकरी मागणार्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वारसाला नियम अटी व निकष बदलून एक वेगळा पर्याय म्हणून तात्काळ पात्रतेनुसार नोकऱ्या देण्यात याव्यात. याशिवाय कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची सदर आजाराची संपूर्ण कालावधीची विशेष रजा बंधने न घालता मंजूर करावी. त्याप्रमाणे बाधित कर्मचाऱ्यांची सर्व वैद्यकीय बीले विनाविलंब मंजूर करण्यात यावीत. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यास अडचणी आल्या व जे कर्मचारी खासगी रुग्णालयात सध्या उपचार घेत आहेत अशा कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चासाठी अग्रीम देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
हेही वाचा -भुताटकीसारखे शब्द वापरणे म्हणजे पोरखेळ - देवेंद्र फडणवीस
संपर्कामुळे होतात कोरोनाबाधित
चालक/वाहक ज्यावेळी कामावरून आगारात येतात, त्यावेळी वाहकांचा संपर्क रोकड शाखेतील कर्मचाऱ्यांशी येतो. तसेच चालकांचा संपर्क कार्यशाळेतील यांत्रिक कर्मचाऱ्यांशी येतो. याशिवाय आगार व्यवस्थापक, चालक/वाहकांची कामगिरी लावणारे पर्यवेक्षक, तसेच इतर कर्मचारी यांचा हस्ते परहस्ते संबंध येतो. त्याचप्रमाणे विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यालय व एस.टी.महामंडळाची इतर सर्व कार्यालये या ठिकाणीसुद्धा कामावर येणारे कर्मचारी, पर्यवेक्षक, अधिकारी हे बस, रेल्वे व इतर वाहनांतून कामावर येतात. त्यामुळे त्या सर्वांचा हस्ते परहस्ते इतर नागरिकांशी संपर्क येतो व त्यामुळेसुद्धा बरेच कर्मचारी व अधिकारी कोरोनाबाधित होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे
परिवहनमंत्र्यांनी लक्ष द्यावे -
श्रीरंग बरगे यांनी सांगितले की, एक एसटी चालक कामावर असताना कोरोनाबाधित झाला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांचा भाऊ सोबत आला होता. तोसुद्धा कोरोनाबाधित झाला एका महिन्याच्या आत दोघेही कोरोनामुळे मृत्यू पावले. त्यांच्या कुटुंबामध्ये दोघांच्या दोन पत्नी तसेच चार लहान मुले आहेत, आता त्यांच्या घरी नोकरी करणारे कुणीही नसून संपूर्ण कुटुंब अडचणीत सापडले आहे. तसेच काही कर्मचारी कोरोनाबाधित झाले, त्यानंतर ते कोरोना या आजारातून बरे झाले. त्यानंतर काही दिवसांनी कोरोनानंतर होणाऱ्या इतर आजारांमुळे मृत्यू पावले आहेत. त्यामुळे तेसुद्धा परिपत्रकानुसार ते आर्थिक लाभ मिळण्यास पात्र ठरत नाहीत. अशा अनेक अडचणींमुळे कर्मचारी आर्थिक लाभापासून वंचित आहेत. या बाबतीत परिवहनमंत्र्यांनी याबाबद लक्ष घालून एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी बरगे यांनी केली आहे.
हेही वाचा -सारथी संस्थेकडे अडकलेली फेलोशिप जूनमध्ये मिळेल - विनायक मेटे