मुंबई - मुंबईत गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. मुंबईमधील कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मुंबईमधील रुग्णसंख्याही कमी होत आहे. मात्र आजही इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मुंबईत केवळ ५ झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन म्हणून सील आहेत. तर ६८ इमारती व १९९८ मजले सील आहेत. मुंबईमधील पालिकेच्या २४ विभागापैकी केवळ २ विभागात झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन म्हणून सील असल्याने मुंबईमधील झोपडपट्ट्या कंटेनमेंट मुक्त झाल्या आहेत. जे काही नवीन रुग्ण आढळून येत आहेत ते इमारतीमधील असल्याने आरोग्य विभागाने इमारतींवर विशेष लक्ष दिले आहे.
कोरोना रुग्णांची आकडेवारी -
मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. गेल्या दीड वर्षात मुंबईमध्ये ७ लाख २७ हजार १४१ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ७ लाख १ हजार ७१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १५ हजार ६१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १३ हजार ३५९ रुग्ण ५० वर्षावरील आहेत. सध्या ७ हजार ४८४ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी ९२८ दिवसांवर पोहचला आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आले अशा ५ झोपडपट्ट्या, ६८ इमारती आणि १९९८ मजले इमारती सील आहेत. कोरोना रुग्ण शोधून काढण्यासाठी ७५ लाख ३४ हजार ५७४ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
इतके कंटेनमेंट झोन -
महापालिकेच्या २४ विभागापैकी २ विभागात ५ झोपडपट्ट्या सील आहेत. अंधेरी पूर्व येथील के ईस्ट विभागात २ तर भांडुप एस विभागात ३ अशा एकूण ५ झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन म्हणून सील आहेत. या झोपडपट्ट्यांमध्ये १ हजार घरे असून त्यात ५ हजार नागरिक राहत आहेत. महापालिकेच्या २४ विभागापैकी १३ विभागात ६८ इमारती सील आहेत. या इमारतींमध्ये ५ हजार घरे असून त्यात २३ हजार नागरिक राहात आहेत. सध्या १९९८ मजले सील असून त्यात ८५ हजार घरे आहेत. त्यात ३ लाख नागरिक राहात आहेत.
काय आहे कंटेनमेंट झोन -
मुंबईत ज्या इमारतीमध्ये ५ पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत, अशा इमारती सील केल्या जातात. ज्या मजल्यावर दोन पेक्षा अधिक रुग्ण आढळून येतात ते मजले सील केले जातात. तर झोपडपट्ट्यांमध्ये नागरिक दाटीवाटीने राहत असल्याने कोरोनाचा प्रसार होऊन रुग्णसंख्या वाढण्याची भीती असते. त्यासाठी रुग्ण आढळून येतात अशा झोपडपट्ट्या सील केल्या जातात. सील केलेल्या विभागाला कंटेनमेंट झोन म्हटले जाते.
कोरोनाचा प्रवास -
मुंबईमध्ये सुरुवातीला इमारतीत कोरोना रुग्ण आढळून आले. त्यानंतर त्यात काम करणाऱ्या कामगारांमुळे झोपडपट्टी आणि चाळींमध्ये कोरोना पसरला. महापालिकेने उपाययोजना करून झोपडपट्टी आणि चाळींमधील कोरोना आटोक्यात आणला. आता दुसऱ्या लाटेत पुन्हा कोरोना इमारतींमध्ये पसरला आहे.
पालिकेचे विशेष लक्ष -
मुंबईत सध्या इमारतींमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्या इमारतींवर विशेष लक्ष दिले जात आहे. रुग्णांशी आरोग्य विभागातील कर्मचारी वेळोवेळी संपर्क ठेवत आहेत. सील केलेल्या इमारतींमधील रुग्ण आणि त्याच्या संपर्कांतील लोक बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.