मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत वाढ होत होती. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. आज मुंबईत कोरोनाच्या सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. आज नव्या 576 रुग्णांची नोंद झाली असून 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सत्तावीस दिवसात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 222 दिवस इतका वाढल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
रुग्ण आणि मृतांचा आकडा कमी झाला -
मुंबईत आज (शनीवारी) कोरोनाचे 576 नवे रुग्ण आढळून आले असून 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 17 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 12 पुरुष तर 11 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 63 हजार 052 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 419 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 245 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 35 हजार 657 वर गेला आहे. सध्या मुंबईत 16 हजार 262 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 222 दिवसांवर -
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 222 दिवस तर सरासरी दर 0.31 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 502 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 6 हजार 320 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 16 लाख 06 हजार 356 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
या आधी नोंद झालेली कमी रुग्ण संख्या -
- 7 नोव्हेंबर 576 रुग्ण
- 6 नोव्हेंबर 792 रुग्ण
- 3 नोव्हेंबर 746 रुग्ण
- 2 नोव्हेंबर 706 रुग्ण