मुंबई - देशात ज्या-ज्या ठिकाणी विरोधी पक्षाची सरकारे आहेत. ही सरकारे अस्थिर करून ती पाडण्याचे षडयंत्र भाजपकडून केले जात आहे. असा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यावरही पोलीस विभागाने आरोप केले होते, तेव्हा त्यांचा राजीनामा घेतला होता का, असा प्रश्नही काँग्रेसने उपस्थित केला आहे. भाजप खासदार डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणी भाजप का कारवाई करत नाही, असा प्रश्नहीही काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे.
राज्यात सध्या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या जिलेटीन असलेल्या गाडीचे प्रकरण गाजत आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली आहे. तर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाली आहे. पोलीस आयुक्त पदावरून बदली होताच सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकला आहे. गृहमंत्र्यांनी बारवाल्यांकडून महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितल्याचे सिंग यांनी पत्रात म्हटले आहे. याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे.
भाजपचे षडयंत्र -
यावेळी बोलताना, देशात आणि राज्यात चुकीच्या पद्धतीचे वातावरण जाणीवपूर्वक केले जात आहे. जेथे सत्ता नाही त्याठिकाणी साम, दाम, दंड, भेद वापरला जात आहे. मध्य प्रदेश, राजस्थानमध्येही असा प्रयत्न झाला. जनतेने पाठिंबा दिला नसेल तरी तो जबरदस्तीने घेऊन सरकार बनवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला. सध्या जे प्रकरण सुरू आहे ते स्क्रीपटेड असून त्याप्रमाणे सर्व सुरू आहे असा आरोप त्यांनी केला. एखादा पुरावा समोर आल्याबरोबर लगेच यांच्या बाईट समोर येतात यावरून हे सर्व ठरवून केले जात असल्याचे दिसत असल्याचे सावंत म्हणाले.