मुंबई- आगामी महापालिका निवडणुकीच्या ( BMC Election ) पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर म्हणजेच दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ( Shivaji Park Dadar ) येथे मनसेचा ( MNS ) मेळावा होत आहे. या मेळाव्याला पालिकेने परवानगी दिली असल्याने मनसे शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. कोरोना संकटानंतर दोन वर्षांनी पहिल्यांदाच मनसेचा मुंबईत पाडव्या निमित्ताने मेळावा होणार आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेची परवानगी - मुंबईतील शिवतीर्थावर म्हणजेच दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे होणाऱ्या (२ एप्रिल रोजी) मनसेच्या गुडीपाढवा मेळाव्याला महापालिकेकडून अटी-शर्थींसह परवानगी ( Permission with conditions ) दिली आहे. संध्याकाळी ५ ते १० या वेळात परवानगी असणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्ष मनसेला शिवाजी पार्कवर मेळावा घेता आलेला नाही. त्यामुळे यंदा गुढी पाडव्याच्या निमित्ताने होणारा मेळावा जल्लोशात होणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने काही महिन्यांवर आलेली पालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार असून मनसैनिकांकडून शक्तीप्रदर्शन केले जाणार असल्याची चर्चा आहे. पुण्यातील सभेत राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात काय बोलायचे आहे ते बोलेन असे जाहीर केले होते. त्यामुळे २ एप्रिल मेळाव्यात राज ठाकरे यांच्या या भाषणाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मुंबई महापालिकेनेही या मेळाव्याला अटीशर्तीसह परवानगी दिल्याने मनसेने मेळाव्याची जय्यत तयारी केली आहे.