मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) हे आज (दि. 18 जून) लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल होणार आहेत. राज ठाकरे यांच्या पायाचे दुखणे वाढल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी योग्य त्या चाचण्या आज केल्या जाणार असून चाचण्या झाल्यानंतर शस्त्रक्रिया कधी करायची हे वैद्यकीय अधिकारी ठरवणार आहेत. शस्त्रक्रियेनंतर सुमारे दोन महिने त्यांना विश्रांती करावी लागणार आहे.
काय आहे आजार ? -माणसाच्या खालून पाचव्या किंवा सहाव्या मणक्यातून खुब्यापासून पायापर्यंत जाणाऱ्या नसांमध्ये दबाव निर्माण झाल्यास त्याचा त्रास जाणवू लागतो. रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. त्यामुळे पाय किंवा खुबा दुखण्यास सुरुवात होते. मात्र, आजाराच्या सुरुवातीलाच काही औषध आणि योग्य व्यायाम करून हा त्रास कमी करू शकतो. यासाठी चार ते सहा आठवडे उपचार करावे लागतात. मात्र, तरीही यामध्ये रुग्णाचा त्रास कमी झाला नाही. तर, एक लहानशी शस्त्रक्रिया करावी लागते. या शस्त्रक्रियेत लेझरट्यूब टाकून त्या नसांवरचा प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. या शस्त्रक्रियेला वैद्यकीय भाषेत इंडॉस्कॉपी डिस्टिकटॉमी, असे म्हणतात.
शस्त्रक्रियेमुळे आयोध्या दौरा पुढे -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी (दि. 22 मे) पुण्यात सभा घेतली. यादरम्यान त्यांनी त्यांच्या हिपच्या समस्येबद्दलही सांगितले. हिप सर्जरीमुळे त्यांनी अयोध्या दौराही पुढे ढकलला होता. राज ठाकरे यांनी 1 जून रोजी आपल्या हिप बोनवर शस्त्रक्रिया करायची असल्याचे सांगितले होते. याच शस्त्रक्रियेमुळे त्यांनी अयोध्या वारी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.
शस्त्रक्रियेनंतर तब्बल दोन महिने विश्रांती -या आजारांमध्ये खुब्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो. खूप वेदना होत असतात. यामुळे अनेक वेळा लंगडत चालावे लागते. किंवा ज्या पायावर अधिक त्रास होतो त्या ठिकाणी दबाव कमी दिला जावा यासाठी प्रयत्न असतो. चालताना किंवा अधिक वेळ उभ राहिल्यामुळे रुग्णाला त्रास जाणवत असतो. हा आजार खेळाडू किंवा शरीराची अधिक हालचाल होणाऱ्या लोकांना अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे शस्त्रक्रियानंतर राज ठाकरे यांना तब्बल दोन महिने विश्रांतीची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे ते दोन महिने राज ठाकरे राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त राहणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
हेही वाचा -Gold Smuggle : रेल्वेद्वारे सोन्याची तस्करी करणाऱ्या 4 आरोपींना अटक, अडिच कोटींचे सोने जप्त