मुंबई -सामाजिक व न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराच्या आरोप करणाऱ्या महिलेवरच मनसे आणि भाजपच्या नेत्यांनी आरोप केला आहे. मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केलेल्या महिलेने आपल्याशीही जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजप नेते कृष्णा हेगडे आणि मनसे नेते मनीष धुरी यांनी केला आहे. याच महिलेने हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न केल्याचेही धुरी यांनी म्हटले आहे.
बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने बदनामी करण्यासाठी हे कृत्य केल्याचा आरोप सामाजिक व न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केला होता. विरोधकदेखील मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपचेच नेते कृष्णा हेगडे हे मुंडे यांच्या मदतीला धावून आले आहेत. या महिलेने आपल्यालाही अडकविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजप नेते हेगडे यांनी केला. ते म्हणाले की, या प्रकरणानंतर मला मनसे नेते मनीष धुरी यांचा फोन आला. त्यांनी म्हटले की, बरे झाले, तुम्ही पुढे येऊन सर्वांना हे सांगितले. कारण या महिलेने माझ्याही बाबतीत हेच केले आहे. त्यामुळे पीडितेवर मुंडे, हेगडे, धुरी या तीन राजकीय नेत्यानी या महिलेवर फसवणुकीचे आरोप केले आहेत.
मनसे नेते मनीष धुरी यांचा महिलेवर आरोप हेही वाचा-"धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर, पक्ष म्हणून लवकर निर्णय घेणार"
काय आहे मनीष धुरी यांचा आरोप?
धनंजय मुंडेंविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या महिलेला माझा नंबर कुठून तरी मिळविला होता. माझ्या जवळ येण्याचा तिने अनेकदा प्रयत्न केला. तिचा हेतू मला कळाला म्हणून मी तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. २०१८-१९ मध्ये ही महिला पैसे उकळण्यासाठी पुन्हा माझ्या संपर्कात आली. मी ही यात अडकलो असतो तर माझाही धनंजय मुंडे झाला असता. आत जर हेंगडेंनी या महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर मी देखील तक्रार दाखल करणार आहे असे मनसेचे मनीष धुरी यांनी सांगितले.
हेही वाचा-धनंजय मुंडे यांची आमदारकी जाणार का? काय म्हणतोय कायदा
काय आहे प्रकरण -
रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. या महिलेचा आरोप आहे की, 'धनंजय मुंडे यांनी मला सांगितले की तुम्हाला गायक बनायचे असेल तर मी चित्रपट जगतातील बड्या चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांसमवेत तुझी भेट करुन देतो आणि बॉलीवूडमध्ये लॉन्च करेन. याचा लोभ धरुन त्यांनी माझ्या इच्छेविरूद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुंडे यांनी सतत लैंगिक अत्याचार केले. जेव्हा-जेव्हा माझी बहीण कामानिमित्त बाहेर पडली, तेव्हा ते मला शारीरिक संबंध बनवण्यास भाग पाडत असत. बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपाने धनंजय मुंडे यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. त्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, धनंजय मुंडे यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.