मुंबई - वूहानच्या धर्तीवर मुंबईतील बीकेसीतील एमएमआरडीए मैदानामध्ये पहिले नॉन क्रिटिकल कोव्हिड हॉस्पिटल बांधून पूर्ण झाले आहे. हे हॉस्पिटल उद्या(सोमवारी) मुंबई महानगर पालिकेकडे हस्तांतरीत केले जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)चे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी याबाबतची माहिती दिली. तसेच याच हॉस्पिटलचा विस्तार करत आणखी 1 हजार बेड वाढवण्याच्या कामाला सुरुवात केल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
राज्यात कोरोना महामारीने बाधित होणाऱ्या रुग्णांचा आकडा सर्वाधित मुंबई शहरामध्ये आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क होते. रुग्णांच्या सोयीसाठी या रुग्णालयाच्या निर्मितीचे काम हाती घेतले. केवळ 15 दिवसाच्या काळात एमएमआरडीएने तब्बल 1008 बेडचे नॉन क्रिटिकल कोव्हिड हॉस्पिटल बांधून पूर्ण केले आहे. दोन दिवसापूर्वीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: या रुग्णालायची पाहणी केली आहे.