मुंबई - राज्यसभेनंतर आता विधान परिषदेची निवडणूक रंगणार आहे. दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात आहेत. 20 जूनला होणाऱ्या या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी, भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा आपली सर्व ताकद पणाला लावणार आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी, भाजपने जोरदार बॅटिंग केली होती. मात्र, राज्यसभा निवडणुकीत भाजपने सेंच्यूरी मारत महाविकास आघीडीरा धूळ चारली होती. त्याप्रमाणे आता विधान परिषदेच्या निवडणुकीत दहाव्या जागेसाठी कोण किती धावा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दहाव्या जागेसाठी कोण मारणार सेंच्यूरी - भारतीय जनता पक्षाकडून पाच उमेदवार या निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. तसेच अपक्ष म्हणून सदाभाऊ खोत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, खोत यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला. त्यांना भाजपने पाठिंबा जाहीर दिला होता. त्यांनी यावेळी भाजपने दिलेल्या संधी आभार मानले. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव गर्जे यांचा अधिकचा अर्ज देखील भरण्यात आला होता. मात्र, तो ही अर्ज मागे घेण्यात आला. आता विधानपरिषद निवडणुकीत कोण सेंच्यूरी मारणार हे येणारा काळच ठरवेल.
'हे' उमेदवार निवडणुक रिंगणात -विधान परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाकडून पाच उमेदवार तर, महा विकास आघाडीकडून सहा उमेदवार असणार आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड हे उमेदवार आहेत. तर, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे, भाई जगताप आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून राम राजे निंबाळकर, एकनाथ खडसे उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. आमशा पाडवी, सचिन अहिर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे.