मुंबई -आमदार दिलीप लांडे ( MLA Dilip Lande ) हे रिक्षा चालक होते. नंतर ते बेस्टमध्ये ड्रायव्हर म्हणून नोकरीला लागले. गेले २५ वर्षे राजकारणात आहेत. २०१२ मध्ये कुर्ला चांदीवली मतदार संघातून ( Chandivali constituency ) पहिल्यांदा मनसेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. २०१७ मध्ये दुसऱ्यांदा ते याच विभागातून मनसेचे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. २०१७ मध्येच त्यांनी मनसेचे ६ नगरसेवक फोडून शिवसेनेत प्रवेश केला. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिलीप लांडे हे चांदीवली मतदार संघातून अवघ्या ४०९ मतांनी निवडून आले आहेत. दिलीप लांडे यांना ८५ हजार ८७९ मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे नसीम खान यांना ८५ हजार ४७० मते मिळाली होती.
मनसेमधून पहिल्यांदा बंडखोरी -२०१२ आणि २०१७ मध्ये दिलीप लांडे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक म्हणून मुंबई महापालिकेत निवडून आले होते. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेचे ८४ आणि भाजपाचे ८२ नगरसेवक निवडून आले. शिवसेनेचा महापौर झाला. मात्र, त्यानंतर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पालिकेवर भाजपाचा महापौर बसवणार असे वक्तव्य केल्याने शिवसेनेने मनसेचे ७ पैकी ६ नगरसेवक फोडले. त्यांना शिवसेनेत प्रवेश देऊन महापौरपद आपल्याकडेच राहील याची व्यवस्था केली. शिवसेनेने मनसेचे जे ६ नगरसेवक फोडले त्यात दिलीप लांडे यांचेही होते. दिलीप लांडे हे मनसेचे गटनेते होते.
दुसऱ्यांदा शिवसेनेतून बंडखोरी -२०१७ मध्ये मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केल्यावर दिलीप लांडे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली. त्यांनी काँग्रेसचे स्थानिक आमदार नसीम खान यांचा पराभव केला. गेले अडीच वर्षे त्यांनी आमदार म्हणून काम केले. नुकतेच शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी जे बंड केले त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकांना लांडे उपस्थित होते. त्यानंतर लांडे यांनी गुवाहटी गाठत ते शिंदे गटात सामील झाले आहेत.