महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विजय वडेट्टीवार आजपासून नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर; अधिकाऱ्यांसमवेत घेणार बैठका - विजय वडेट्टीवार न्यूज

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे लातूर, नांदेड, पुणे, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे या दौऱ्याकडे लक्ष लागलेले आहे.

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

By

Published : Oct 18, 2020, 2:31 AM IST

मुंबई- राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आजपासून जाणार आहेत. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे उभी पीके वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज असल्याने मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे आजपासून या भागाचा पाहणी दौरा करून नुकसानीचा आढावा घेणार आहेत.

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार राज्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आजपासून असणार आहेत. वडेट्टीवार हे १८ ऑक्टोबरला सकाळी नांदेड येथे जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत वडेट्टीवार हे पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांसोबत लातूर जिल्ह्यातील उदगीर, देवणी, शिरुर अनंतपाळ व निलंगा तालुक्याचा दौरा करून नुकसानीची पाहणी करणार आहेत. तसेच दुपारी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा, उमरगा, तुळजापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांचा दौरा करून उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.

मदत आणि पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार हे १९ ऑक्टोबरला सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ व बार्शी तालुक्यातील नुकसानीची पाहणी करून अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांना भेटी देणार आहेत. त्यानंतर अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत. या दौऱ्यात विजय वडेट्टीवार अधिकाऱ्यांसोबतच शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेणार आहेत.

दरम्यान, अतिवृष्टीचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अशा संकटात सरकारने मदत करावी, अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details