मुंबई - भायखळा पूर्व परिसरात केंद्र शासनाच्या अखत्यारीतील 'रिचर्डसन आणि क्रुडास' कंपनीच्या परिसरात तात्पुरत्या स्वरूपातील एक मोठे कोरोनाचे उपचार केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राचे लोकार्पण वस्त्रोद्योग मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख व मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी खासदार अरविंद सावंत, आमदार यामिनी जाधव, आमदार अमिन पटेल, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, 'परिमंडळ १'चे उपायुक्त हर्षद काळे, 'इ' विभागाचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर उपस्थित होते.
कोरोना बाधित रुग्णांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता यावेत, यासाठी बृन्हमुंबई महापालिका क्षेत्रातील काही ठिकाणी 'जंबो फॅसिलिटी' अर्थात अधिक क्षमतेची उपचार केंद्रे उभारण्यात येत आहेत. आता भायखळा पूर्व येथेही तब्बल १ हजार खाटांची क्षमता असलेल्या उपचार केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
कोरोना रुग्णांवर उपचार करताना शरिरातील प्राणवायूच्या पातळीची अर्थात 'ऑक्सिजन लेव्हल'ची महत्त्वाची भूमिका असते. ही बाब लक्षात घेऊन याठिकाणी असणाऱ्या १ हजार खाटांपैकी ३०० खाटा या 'ऑक्सीजन बेड' असणार असल्याचे, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, 'या ठिकाणी अद्यावत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून यासोबतच या ठिकाणी ५० डॉक्टर्स, १०० नर्सेस आणि १५० परिचारिका व इतर वैद्यकीय कर्मचारी असे एकूण ३०० कर्मचारी २४ तास कार्यरत असणार आहेत.'
याव्यतिरिक्त आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका व रुग्णसेवेसाठी आवश्यक असणाऱ्या इतर बाबी देखील गरजेनुरूप उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे महापौरांनी यावेळी स्पष्ट केले. या उपचार केंद्राच्या उभारणीच्या अनुषंगाने वैद्यकीय विषयक बाबींचे नियोजन करण्याची जबाबदारी 'परिमंडळ १' चे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रमोद आष्टेकर आणि 'इ' विभागाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर निपा मेहता यांनी पार पाडली.
हेही वाचा -शिक्षणाच्या आढावा बैठकीत ऑनलाईनचा गाजावाजा; ग्रामीण भागातील वास्तवाकडे दुर्लक्ष
हेही वाचा -बोगस बियाणे प्रकरणी कारवाई, भरमसाठ वीजबिलाची कोंडी दूर करा; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र