मुंबई - लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या नागरिकांना घरी पोहचवण्यासाठी एसटीच्या बसेस चालवण्याचा विचार आहे. मात्र, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी परवानगी दिल्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे.
यापूर्वी राजस्थानच्या कोटा येथे अडकलेल्या राज्यातील 1 हजार 764 विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी धुळे येथून राज्य परिवहन विभागाच्या 72 एसटी बस सोडण्यात आल्या होत्या.
एसटी महामंडळाकडून एक पोर्टल तयार केले जाईल. त्या पोर्टलवर नागरिकांनी आपली माहिती भरायची आहे. मुंबई, पुणे आणि इतर जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना बसमधून सुरक्षित अंतर राखत आणि लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत त्यांच्या गावी पोहोचविण्याचे काम महामंडळाकडून करण्यात येईल. मात्र, कन्टेंनमेंट झोनमधील नागरिकांना या बसमधून प्रवास करता येणार नाही, असेही परब यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या बुधवारपर्यंत १६ हजार ७५८ झाली आहे. बुधवारी १ हजार २३३ नवीन रुग्णांचे निदान झाले.