मुंबई- लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळील ( Lower Parel Railway Station ) डिलाईल पूल जीर्ण झाल्याने हा पूल रेल्वेने तोडला आहे. त्याचे ८५ मीटर लांबीचे बांधकाम करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ( BMC ) रेल्वेला ( Railway ) निधी दिला आहे. तसेच, या पुलावर ना.म. जोशी मार्गावरुन येणारे २ आणि गणपतराव कदम मार्गावरुन येणारा १ असे तिन्ही मिळून एकूण ६०० मीटर लांबीचे तीन पोहोच रस्त्यांचे बांधकाम महानगरपालिका करत आहे. या कामांच्या प्रगतीची पाहणी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी ते म्हणाले, पुलाच्या बांधकामास विलंब होत आहे. याबाबत मी रेल्वे मंत्र्यांना पत्र दिले आहे. याबाबत बैठकाही झाल्या आहेत. त्यानंतरही पुलाच्या कामाला विलंब होत असल्याने, नेमक्या कोणत्या तांत्रिक कारणाने रेल्वेच्या कामांना विलंब होतो आहे, ते रेल्वे प्रशासनाने जनतेसमोर मांडणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aditya Thackeray ) यांनी मांडले आहे.
यावेळी आमदार सुनील शिंदे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, माजी मंत्री सचिन अहिर, माजी महापौर स्नेहल आंबेकर, माजी नगरसेवक आशीष चेंबूरकर, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पूल) सतीश ठोसर, जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.