मुंबई- भारत-चीन प्रश्नावर केंद्रातील मोदी सरकारला आलेल्या अपयशावरून काँग्रेसने चहूबाजूने घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री आणि मुंबईचे माजी प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांनी चीन प्रश्नावर आपल्याच पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. इतकेच नव्हे तर काँग्रेसचे नेते व माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेला देवरा यांनी अप्रत्यक्षरित्या आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.
चीन प्रश्नावरून मिलिंद देवरांची पक्षविरोधी भूमिका?
देवरा यांनी आज (रविवारी) एक ट्विट करून चीन प्रश्नावर सुरू असलेल्या वादात उडी घेत यासाठी तडजोडी करण्याची भूमिका मांडली आहे. तसेच चीन प्रश्नावरून सुरू करण्यात आलेले राजकारण आणि त्यासाठी सुरू असलेली राजकीय चिखलफेक योग्य नसल्याचा दावा करत त्यांनी आपल्याच पक्षावर निशाणा साधला आहे.
मिलिंद देवरा, (फोटो -सौजन्य सोशल मीडिया)
देवरा यांच्या एका ट्विटमुळे काँग्रेसमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. देवरा यांनी केलेले हे ट्विट केवळ चीनसोबत असलेल्या आपल्या जवळच्या व्यापाऱ्यांचे आर्थिक व्यवहार आणि त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी केले असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात ही भूमिका घेतली असावी, असे बोलले जात आहे.