महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 22, 2020, 5:00 PM IST

ETV Bharat / city

'फेक' मॅसेजबाबत नागरिकांना म्हाडाचा सावधानतेचा इशारा

म्हाडाच्या घरविक्रीसंदर्भात फिरत असलेल्या सोशल मीडियावरील 'फेक' मॅसेजबाबत म्हाडाने सावधानतेचा इशारा दिला आहे. 'तुम्हाला म्हाडाचे घर हवे असल्यास पेटीएमवर अथवा पोस्टाच्या या खात्यावर पैसे पाठवा' असे मॅसेज पाठवून फसवणूक केली जात आहे. यावर म्हाडाने खुलासा केला आहे.

MHADA warns citizens about 'fake' messages in mumbai
'फेक' मॅसेजबाबत नागरिकांना म्हाडाचा सावधानतेचा इशारा

मुंबई - म्हाडाच्या घरविक्रीसंदर्भात फिरत असलेल्या सोशल मीडियावरील 'फेक' मॅसेजबाबत म्हाडाने सावधानतेचा इशारा दिला आहे. 'तुम्हाला म्हाडाचे घर हवे असल्यास पेटीएमवर अथवा पोस्टाच्या या खात्यावर पैसे पाठवा' असे मॅसेज पाठवून फसवणूक केली जात आहे. यावर म्हाडाने खुलासा केला आहे. अशा प्रकारच्या व्यवहारांमध्ये सहभागी झाल्यामुळे फसगत झाल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे म्हाडाच्या वतीने कळवण्यात येत आहे.

फसवणूक होत असल्याची माहिती म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा विभागाच्या पुढील पत्त्यावर कळवावी.

पत्ता

मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी, गृहनिर्माण भवन, चौथा मजला, कला नगर, वांद्रे पूर्व, मुंबई -५१. दूरध्वनी क्रमांक - ०२२-६६४०५४४५, ०२२-६६४०५४४६.

म्हाडाच्यावतीने अशा प्रकारे कोणत्याही स्वरुपाचे पैशाचे व्यवहार केले जात नाहीत. तसेच म्हाडाने या कामाकरता कुठल्याही प्रतिनिधींची नेमणूक केली नाही, असा खुलासा म्हाडाच्यावतीने करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर काही संदेश फिरत असल्याचे म्हाडा प्रशासनाच्या लक्षात आले आहे. या संदेशामध्ये दादर परिसरात म्हाडाची घरे विक्रीस उपलब्ध असल्याची बतावणी करुन नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे. या संदेशासोबतच काही लोकांना थेट संपर्क करुन देखील अशा पध्दतीने म्हाडाची घरे विकत असल्याचा बनाव केला जातो. त्याकरता या व्यक्ती 'पेटीएम'वरून अथवा 'कॉर्पोरेट सेंट्रल कलेक्टीव हब म्हाडा' या नावाने इंडीयन पोस्ट बँकेच्या खात्यावर पैसे मागवीत आहेत. म्हाडा ही संस्था सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची संस्था असून, गेल्या ७० वर्षांपासून नागरिकांचे गृहस्वप्न साकारण्याचे काम करीत आहे.

म्हाडातर्फे बांधण्यात आलेल्या सदनिका या जाहीर संगणकीय सोडत प्रक्रियेद्वारे वितरीत केल्या जातात. त्याकरीता विक्रीस उपलब्ध असलेल्या सदनिकांची जाहीरात नागरिकांच्या माहितीसाठी वर्तमान पत्रातून प्रसिद्ध करण्यात येते. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर सदनिका विक्रीचे अर्ज नागरिकांकडून मागवले जातात. या अर्जाची रक्कम व अनामत रक्कम म्हाडा जाहिरातीतच नमूद करते. या सर्व प्रक्रियेनंतर सदनिकांची जाहीर संगणकीय सोडत काढण्यात येते. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पध्दतीने राबविण्यात येते.


नागरिकांनी कोणत्याही मध्यस्थांच्या, दलालांच्या आश्वासन भूल थापांवर विश्वास ठेवू नये. अशा प्रकारच्या कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता म्हाडाच्या पारदर्शक संगणकीय सोडत प्रणालीवर आधारित प्रक्रियेतच सहभाग घ्यावा. म्हाडाच्या सदनिकांचे वितरण हे केवळ संगणकीय सोडत प्रणालीच्याच माध्यमातून करण्यात येत असते. भविष्यातही हीच कार्यप्रणाली कार्यरत राहणार असून याकरिता कोणत्याही मध्यस्थांची, दलालांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details