महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बीडीडी चाळीतील २७२ घरांसाठी म्हाडाची लॉटरी, दोन-अडीच वर्षात बीडीडीवासीयांना घरे देऊ - आव्हाड

म्हाडात ना. म. जोशी मार्ग चाळीतील 272 घरांसाठी लॉटरी प्रक्रिया पार पडली. बीडीडीवासीयांना 500 चौ. फुटांची घरे मिळाली. या 272 रहिवाशांसह यापुढच्या रहिवाशांना दोन-अडीच वर्षात पुनर्वसित इमारतीतील हक्काच्या घरात नेले जाईल, असा विश्वास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

MHADA lottery
MHADA lottery

By

Published : Feb 12, 2021, 3:52 PM IST

Updated : Feb 12, 2021, 4:02 PM IST

मुंबई - बीडीडीवासीयांना 160 चौ. फुटाच्या घरातून 500 चौ. फुटाच्या घरात नेण्याच्या दृष्टीने आज आम्ही महत्वाचे पाऊल टाकले आहे. आजचा दिवस ऐतिहासिक असून आता पुनर्विकासात घर निश्चित झाले आहे. तर आता या 272 रहिवाशांसह यापुढच्या रहिवाशांना दोन-अडीच वर्षात पुनर्वसित इमारतीतील हक्काच्या घरात नेले जाईल, असा विश्वास मी देतो अशी प्रतिक्रिया गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत ना. म. जोशी मार्ग येथील पात्र आणि संक्रमण शिबिरात स्थलांतरित झालेल्या 272 रहिवाशांच्या घराची निश्चिती करण्यासाठी आज म्हाडा भवनात लॉटरी काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर आदी यावेळी उपस्थित होते.

बीडीडी चाळीतील २७२ घरांसाठी लॉटरी
आता होणार करार -

बीडीडी पुनर्विकासात टप्प्या-टप्प्यात रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करत त्यांच्या इमारती रिकाम्या करून घेत त्या पाडल्या जातील. त्यानंतर मग त्या जागेवर पुनर्वसित इमारतीच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे. त्यानुसार रहिवाशांची पात्रता निश्चित करत त्यांना संक्रमण शिबिरात हलवण्यात येत आहे. आतापर्यंत ना. म. जोशीमधील 272 रहिवाशांना संक्रमण शिबिरात हलवण्यात आले आहे. दरम्यान संक्रमण शिबिरात गेलेल्यांशी म्हाडा करार करणार आहे. ज्यामुळे रहिवाशांना घराची कायदेशीर हमी मिळणार आहे. पण हा करार करताना नव्या इमारतीत कोणत्या मजल्यावर, कोणते घर मिळणार हे निश्चित करत करारात ही माहिती नमूद करावी, अशी मागणी रहिवाशांची होती. ही मागणी मान्य करत राज्य सरकारने आणि म्हाडाने आजची लॉटरी घेतली आहे. इमारत बांधली नसतानाही रहिवाशांची घरे, मजला निश्चित झाला आहे. त्यामुळे त्यांना आता हक्काच्या घराची हमी मिळाली आहे. त्यानुसार आता या 272 रहिवाशांशी लवकरच करार केला जाणार असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले आहे. दरम्यान आज ऑनलाइन पद्धतीने लॉटरी पार पडली. यावेळी महादेव मुरकुटे हे पहिले लाभार्थी ठरले.

5 हजार हेक्टरची लॅण्ड बँक निर्माण करणार -

सर्वसामान्यांना हक्काची घरे देण्यासाठी म्हाडाची निर्मिती झाली आहे. पण सद्या मुंबईत घरे बांधण्यासाठी म्हाडाकडे जमिनीच नाहीत. त्यामुळे आता एमएमआर आणि राज्यात मोठ्या संख्येने घरे बांधण्यासाठी जमिनी मिळणार आहेत. जॉईंट व्हेंचरमध्ये जमिनी खरेदी करण्यात येतील. त्यानुसार 5 हजार हेक्टर लॅण्ड बँक जॉईंट व्हेंचरमध्ये निर्माण करू, अशी माहितीही आव्हाड यांनी दिली आहे.

5 वर्षात सर्वांना घरे देण्याचा संकल्प-

बीडीडीवासीयांना हक्काची घरे देऊ, असे वचन आम्ही रहिवाशांना दिले होते. ते वचन आज आम्ही पूर्ण करत आहोत. तर यापुढे ही सर्वसामान्याचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. चांगली घरे देऊ. पुढच्या 5 वर्षात राज्यात सर्वांना घरे देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

म्हाडात लॉटरी, ना. म. जोशीत आंदोलन -

आज म्हाडात ना. म. जोशी मार्ग चाळीतील 272 घरांसाठी लॉटरी पार पडत असताना दुसरीकडे ना. म. जोशी येथे राजू वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या रहिवासी संघटनेने आंदोलन केले. या लॉटरीला विरोध करत ही दिशाभूल असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पुनर्विकास ठप्प असताना रहिवाशांच्या अनेक मागण्या मान्य झालेल्या नसताना लॉटरी का, असा सवालही त्यांनी केला आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी मात्र या आंदोलनावर प्रतिक्रिया देण्यास यावेळी नकार दिला.

Last Updated : Feb 12, 2021, 4:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details