मुंबई -राज्यपाल नामनिर्देशित 12 सदस्यांच्या नेमणुकीबाबत पुन्हा एकदा महाविकास आघाडी सक्रिय झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी राजभवनात जाऊन भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपाल नामनिर्देशित 12 सदस्यांच्या नेमणुकीबाबत नार्वेकर यांनी राज्यपालांकडे वेळ मागितला. राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना भेटीसाठी एक सप्टेंबरची वेळ दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे आज 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात राज्यपालांना आज भेटणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, राजभवनाकडून आघाडी सरकारच्या नेत्यांना भेटी संदर्भात कोणतीही वेळ देण्यात आले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी राज्यपालांची भेट घेऊन राज्यपालांची वेळ मागितली. पुढील चार दिवस राज्यपाल कामानिमित्त महाराष्ट्राच्या बाहेर असल्याने राज्यपालांकडून 1 सप्टेंबरची वेळ महाविकास आघाडीच्या सरकारला देण्यात आली आहे. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारचे नेते 1 सप्टेंबरला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.
12 आमदारांच्या नेमणुकीचा प्रश्न सुटणार?
राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्ती बाबतचे पत्र महाविकास आघाडी सरकारने आठ महिन्यापूर्वी राज्यपालांना दिले होते. मात्र राज्यपालांनी याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने राज्य सरकारकडून हे सर्व प्रकरण उच्च न्यायालयाकडे नेण्यात आले. उच्च न्यायालयानेदेखील राज्यपालांनी यासंदर्भात निर्णय लवकरात लवकर घेतला पाहिजे असे निरीक्षण नोंदविले होते.
हेही वाचा-मुंडे-खोतकर परिवाराच्या आठवणींना उजाळा, एकमेकांच्या पाठीशी उभ असल्याची दोन्हीकडून ग्वाही