मुंबई -तब्बल सात महिन्यानंतर वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो 1 सोमवार पासून वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. लोकलच्या मर्यादा आणि कोरोनाची भीती लक्षात घेता मेट्रोचा प्रवास सुरक्षित मानला जात असल्याने हजारो मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोनासंबंधीचे नियम पाळताना मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) ला अनेक बदल करावे लागले आहेत. त्यानुसार, आता मेट्रोच्या फेऱ्या कमी होणार असून मेट्रोची प्रवासी क्षमता थेट 50 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. आधी दररोज पहाटे साडेपाच वाजल्यापासून रात्री साडेअकरापर्यंत धावणारी मेट्रो आता मात्र सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ, अशी 12 तासाचं सेवा देणार असल्याची माहिती एमएमओपीएलने दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गर्दी कमी करत फिजिकल डिस्टनसिंग पाळता यावी, यावर एमएमओपीएलने विशेष भर दिला आहे. त्यामुळेच मेट्रो गाड्यांमधील प्रवासी क्षमता 50 टक्के करण्यात आली आहे. एका डब्यात 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.