महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मेट्रो कारशेडचे काम थांबणार नाही.. कांजूरची जागा आमचीच - एकनाथ शिंदे - मुंबई मेट्रो कारशेड

कारशेडच्या जागेवरून आता मोठा वाद सुरू झाला असून ही जागा आपली असल्याचा दावा करत कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्याला दिले आहेत. मात्र कांजूरची जमीन आम असून कारशेडचे काम सुरूचे राहणार असल्याचे आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Metro car shed work will not stop
मेट्रो कारशेडचे काम थांबणार नाही

By

Published : Nov 6, 2020, 9:30 PM IST

Updated : Nov 6, 2020, 9:43 PM IST

मुंबई -कांजूरमार्ग येथे मेट्रो 6 (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) आणि मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीपझ) चे कारशेड कांजूरमार्ग येथे होणार आहे. मात्र या जागेवरून आता मोठा वाद सुरू झाला असून ही जागा आपली असल्याचा दावा नुकताच केंद्र सरकारने केला आहे. तर कारशेडचे काम त्वरित थांबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता कारशेडचे काम बंद होणार का आणि पर्यायाने मेट्रो 6 आणि मेट्रो 3 प्रकल्प रेंगाळणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. पण राज्य सरकार मात्र ही जागा आपलीच आहे, जागा आपल्याच मालकीची आहे या भूमिकेवर ठाम आहे. तर कोणत्याही परिस्थितीत कारशेडचे काम बंद होणार नाही अशी माहिती आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

मेट्रो 3 चे कारशेड आरेत करावे ही भाजपची ठाम भूमिका आहे. त्यामुळेच आरेतून कारशेड हलवण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी जोरदार विरोध केला आहे. तर यावरून आता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा वाद सुरू झाला. तर आता हा वाद आणखी पेटला आहे. कारण आता थेट केंद्राने ही यात उडी घेतली आहे. केंद्र सरकारने कांजूरच्या जागेवर कारशेड बांधण्यात येत आहे ती जागा मिठागराची असून ती आमच्या मालकीची आहे. त्यामुळे एमएमआरडीएने त्वरित कारशेडचे काम थांबवावे अशी नोटीस केंद्राने राज्याला बजावली आहे.

मेट्रो कारशेडच्या कामाबाबत माहिती देताना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

केंद्राच्या या दाव्यानंतर आणि नोटीसनंतर एकच खळबळ उडाली आहे. महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे आता कारशेडचे काम थांबणार का आणि जमीन केंद्राकडे जाणार का? तर यावरून राज्य आणि केंद्रातही आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

काम सुरूच राहणार..

केंद्राच्या दाव्यानंतर कांजूरमधील काम बंद होणार अशी शक्यता व्यक्त होत होती. पण प्रत्यक्षात मात्र अजूनही काम बंद झालेले नाही वा काम बंद होण्याची कोणतीही शक्यता नाही. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कांजूरची जागा राज्य सरकारचीच असून कोणत्याही परिस्थितीत कारशेडचे काम बंद होणार नाही असे ठणकावून सांगितले आहे. तर आता एकनाथ शिंदे यांनी ही कारशेडचे काम कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही असे ठणकावले आहे. तर ही जागा सरकारचीच असल्याचा पुनरुच्चार ही त्यांनी केला आहे.

केंद्राचा फलक कारशेडच्या जागेच्या बाहेर!

केंद्र सरकारने कांजूरची जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. तर हा दावा केल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली. राज्य आणि केंद्र असा संघर्ष सुरू झाला. राज्य सरकारने ही जागा आपलीच असल्याचा दावा करत केंद्राचे सर्व दावे फेटाळून लावले. पण केंद्र ही आपल्या दाव्यावर ठाम आहे. त्यामुळेच केंद्राने कांजूर येथील जागेत आपल्या नावाचा जागेची मालकी दर्शविणारा फलक लावत राज्य सरकारला आव्हान दिले आहे. पण हा फलक कारशेडच्या जागेच्या बाहेर असून या फलकामुळे काहीही फरक पडणार नसल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. मेट्रो 4 आणि मेट्रो 4 अ प्रकल्पाच्या एका कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

मंदिराबाबत अजून तरी निर्णय नाही -

राज्यातील मंदिरे सुरू करण्याची जोरदार मागणी सध्या होत आहे. तर या मागणीसाठी तुळजापूर येथे मोठे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने हळूहळू सर्व गोष्टी सुरू केल्या आहेत. इतकेच नव्हे तर आता सिनेमा गृह ही सुरू होत आहेत. मग मंदिरेच का बंद असा सवाल आंदोलनकर्त्याकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांना याबाबत विचारले असता त्यांनी सावध भूमिका घेतली आहे. युरोपात कोरोनाची दुसरी लाट आली असून ही लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त गंभीर, तीव्र आहे. अशावेळी महाराष्ट्रात कॊरोना नियंत्रणात असला तरी दुसरी लाट येण्याची भीती आहे. ही भीती लक्षात घेता आम्ही विचारपूर्वक पाऊल टाकत आहोत. तेव्हा मंदिराबाबत अजून काहीही निर्णय घेतला नसल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.

Last Updated : Nov 6, 2020, 9:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details