मुंबई - पुढील दोन आठवड्यात जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महा विकास आघाडी सरकारला झटका बसला असून राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार आपल्याकडे घेण्यासाठी केलेल्या विधेयकानंतर ही राज्य सरकार आता अडचणीत सापडले आहे. या पेचप्रसंगातून मार्ग करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. तर राज्य सरकारला हा खूप मोठा फटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा अभ्यास करून मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत यावर बैठक होणार आहे. या बैठकीला दिल्लीतील वकिलांना बोलावून घेतले असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.
दुपारी बैठक - सह्याद्री अतिथीगृहात आज दुपारी बैठक पार पडेल. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर यातून घटनात्मक मार्ग काढता येतो का, याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. यातून मार्ग काढता येतो का याबाबत चर्चा केली जाणार आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात कोणत्याही निवडणुका होऊ नयेत हीच भूमिका राज्य सरकारची होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता याबाबतचा नवा मार्ग शोधण्याची गरज असल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या आणि नेत्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.