मुंबई - मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसे आग्रही आहे. राज ठाकरे यांनी दिलेली मुदत आज संपणार आहे. मनसेची पुढील भूमिका ठरवण्यासाठी राज ठाकरे यांनी निवडक पदाधिकाऱ्यांची आज बैठक ( MNS Leader Meeting In Mumbai ) बोलावली. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होतो, हे पाहणे महत्वाचे आहे.
दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण -मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भोंगे उतरवण्याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. 3 मे पर्यंत भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम दिला होता. उद्यापासून मुदत संपणार आहे. मशिदीवरील भोंगे न उतरवल्यास कोणाचेही एकूण घेणार नाही. मशिदींसोमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करू, असा इशारा दिला आहे. राज्यातील राजकारण यामुळे तापले आहे.
मनसे पुढील भूमिका जाहीर करणार - अक्षय तृतीयाच्या निमित्ताने मनसेकडून राज्यभरात महाआरतीचे आयोजन केले होते. मात्र सोमवारी राज ठाकरे यांनी महाआरती रद्द करण्याच्या सूचना दिल्या. तसेच लवकरच ट्विटरच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट करू असे जाहीर केले. आज भोंग्याबाबत मनसेने दिलेली मुदत संपणार आहे. त्यामुळे पुढील भूमिका ठरवण्यासाठी मनसेच्या काही निवडक पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार आदी पदाधिकाऱ्यांना बैठकीला बोलवण्यात आले आहे. त्यामुळे मनसेच्या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार, हे पाहावे लागणार आहे.