मुंबई - कोरोना व्हायरसचा मुंबईसह महाराष्ट्रात झपाट्याने प्रसार होत आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. रुग्णांच्या चाचण्या केल्यावर त्यांचे चाचणी अहवाल वेळेवर मिळत नाही, अशी तक्रार केली जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. याबाबत मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांचे कान उपटत त्यांनी रुग्णांना त्यांचे कोरोना चाचणीचे अहवाल लवकरात लवकर देण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. याठिकाणी परिस्थिती नियंत्रणातच राहिली पाहिजे. त्यासाठी तातडीने भरारी पथके सक्रीय करून तपासणीला सुरुवात केली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्यांतील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईमधील लोकसंख्या आणि दाट लोकवस्ती तसेच विषाणू प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला वरील निर्देश दिले आहेत. त्यांनी महापालिकेचे उपायुक्त तसेच वॉर्ड अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली, यावेळी महत्वपूर्ण सूचना केल्या.
हेही वाचा...Coronavirus : मंत्रालयात महापालिका कर्मचाऱ्यांकडून निर्जंतुकीकरण फवारणी
मुंबई पालिकेचे कर्मचारी कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जातात. अनेक गंभीर संकटात त्यांनी काम केले आहे. त्यामुळे आपल्याला अधिक जलदपणे या संकटात काम करायचे आहे. आपल्या येथे रुग्णांच्या चाचणीचे अहवाल तातडीने मुख्यालयात कसे येईल, हे पाहिले पाहिजे. म्हणजे मुकाबला करण्यासाठी लगेच आवश्यक ते नियोजन करता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. आपापल्या वॉर्डमधील खासगी डॉक्टर्सना शोधून त्यांना त्यांचे दवाखाने सुरू करण्याची विनंती करा. त्यांना आवश्यक ते मास्क वगैरे द्या, पण नियमित रुग्ण तपासण्यास सुरुवात झाली तर शासकीय आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले आहे. विशेषत: वस्त्यांमधून स्वच्छतागृहे स्वच्छ राहतील, त्याठिकाणी आवश्यक फवारणी होत राहील. हात धुण्यासाठी साबण उपलब्ध असेल, हे सर्व पहा. साथीचा आजार वस्त्यांमध्ये पसरायला वेळ लागणार नाही त्यामुळे वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राहिलीच पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा...कोरोनामुळे मरू तेव्हा मरू...! मात्र आता आमच्यावर उपासमारीची वेळ आलीय.... ऊसतोड कामगारांची कैफियत...
कोणत्याही परिस्थिती फैलाव थांबवा
वरळी कोळीवाड्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर संपूर्ण कोळीवाडाचा परिसर दूषित क्षेत्र म्हणून घोषित केला. तेथील नागरिकांच्या हालचालीवर निर्बंध आले आहेत. या घटनेनंतर अशाच प्रकारे मुंबईत साथ फैलावून आणखी दुषित क्षेत्र निर्माण झाल्यास आरोग्य यंत्रणा तसेच प्रशासनाला हा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. मुंबई हे देशातील एक प्रमुख शहर असून आर्थिक राजधानी आहे. याठिकाणी कोणत्याही परिस्थिती नियंत्रणात राहिली पाहिजे. त्यासाठी तातडीने भरारी पथके सक्रीय करून तपासणीस सुरुवात झाली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.