मुंबई -वांद्रे- कुर्ला संकुलातील मुंबई महानगरपालिकेच्या जम्बो कोविड लसीकरण केंद्राला बुधवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भेट देऊन, ज्येष्ठ नागरिकांसोबत लसीकरणाबाबत संवाद साधला. यावेळी उपमुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष रेवणकर, वांद्रे- कुर्ला संकुलातील जम्बो कोविड समर्पित रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महापौरांनी साधला संवाद
महापौरांनी लसीकरणासाठी आलेल्या ज्य़ेष्ठ नागरिकांशी संवाद साधून, लसीकरणाबाबत माहिती दिली. लसीकरणानंतर घरी गेल्यावर आपल्याला कुठल्याही प्रकारे त्रास होत असेल तर फॉर्मवर दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून, आपण महापालिकेकडे कधीही मदत मागू शकता. तसेच घरी गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची धावपळ न करता, आराम करून स्वतःची काळजी घेण्याचे आवाहनही यावेळी महापौरांनी केले. यावेळी लसीकरण झालेल्या काही नागरिकांनीही आपले अनुभव सांगितले.
जेष्ठ नागरिकांची गर्दी
1 मार्चपासून 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक व 45 ते 59 वयोगटातील गंभीर आजार असलेल्या नागरिकांना कोरोनाची लस दिली जात आहे. त्यासाठी पालिका, सरकारी, खासगी रुग्णालये तसेच सर्व जंबो कोविड सेंटरमध्ये जेष्ठ नागरिकांनी गर्दी केली आहे. तीन दिवसात 17 हजार 926 जेष्ठ नागरिकांना लस देण्यात आली आहे.