मुंबई- कोरोनाच्या लढाईत सर्वात मोठी भूमिका राज्यभरातील निवासी डॉक्टर बजावत आहेत. मात्र त्याचवेळी त्यांच्याकडेच राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने केला आहे. आपल्या स्टायपेंड (विद्यावेतन)मध्ये 20 हजार रुपयांची वाढ करण्याची मागणी मार्डने केली आहे.
निवासी डॉक्टरांना 20 हजार रुपये विद्यावेतन वाढ द्या - मार्डची मागणी - कोविड रुग्णालय मुंबई
निवासी डॉक्टर कोविड रुग्णालयात सेवा देत आहेत. या डॉक्टरांवर सध्या रुग्णसेवेची भिस्त असल्याचे म्हटले जात आहे. मुंबईत तर मार्डचे डॉक्टर कोविड रुग्णालयासह धारावी, वरळीसारख्या हॉटस्पॉटमध्येही काम करत आहेत.
राज्यात अंदाजे 4 हजार 500 निवासी डॉक्टर आहेत. सध्या हे सर्व डॉक्टर कोविड रुग्णालयात सेवा देत आहेत. या डॉक्टरांवर सध्या रुग्णसेवेची भिस्त असल्याचे म्हटले जात आहे. मुंबईत तर मार्डचे डॉक्टर कोविड रुग्णालयासह धारावी, वरळीसारख्या हॉटस्पॉटमध्येही काम करत आहेत. दरम्यान नुकतीच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारात 20 हजारांनी वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे कोविडसाठी नव्याने सेवेत घेण्यात येणाऱ्या डॉक्टरांना भरघोस पगार देण्यात येत आहे. पण आमच्याकडे मात्र दुर्लक्ष आहे. आम्हाला कोणतीही वाढ देण्यात आलेली नाही.
या पार्श्वभूमीवर निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमध्ये 20 हजार रुपयांची वाढ करावी, अशी आमची मागणी असल्याची माहिती मार्डचे अध्यक्ष डॉ. राहुल वाघ यांनी दिली आहे. सध्या निवासी डॉक्टरांना महिन्याला 54 हजार रुपये इतका स्टायपेंड मिळतो. ही मागणी मार्डकडून राज्य वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाकडे करण्यात आली आहे. तेव्हा या मागणीचा विचार सरकार करते का, याकडे आता मार्डचे लक्ष लागले आहे.