मुंबई- बॉडी बिल्डर आणि माजी मिस्टर इंडिया, मनोज पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनोजने या आत्महत्येच्या प्रयत्नासाठी चित्रपट अभिनेता आणि सोशल मीडियावर प्रभावकार साहिल खानला दोषी ठरवले. त्यानंतर साहिलने आपली बाजू मांडली आहे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनोज पाटीलने राज फौजदार नामक एका बॉडी बिल्डरला बनावट आणि कालबाह्य झालेले स्टिरॉइड्स विकले होते. ज्याची किंमत दोन लाख रुपये होती. जेव्हा राज फौजदार यांनी साहिलला याबाबत माहिती दिली, तेव्हा साहिलने हे रॅकेट उघड करण्यासाठी सोशल मीडियावर मनोजच्या विरोधात गोष्टी लिहिल्या जेणेकरून सर्वांना त्याबद्दल माहिती मिळेल, असे साहिलने पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी सांगितले आहे, की साहिल खान आणि अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज पाटीलला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
पाटील यांनी विकलेली स्टिरॉइड्स आणि त्याची सर्व बिले दाखवत साहिल म्हणाला की, जेव्हा राज फौजदारांनी त्याच्याकडे तक्रार केली आणि पैसे परत मागितले. तेव्हा मनोजने तसे केले नाही आणि त्याला धमकी दिली. साहिलखान पुढे म्हणाला की मनोज बनावट स्टेरॉईडच्या मोठ्या रॅकेटमध्ये सामील आहे आणि ते उघड करण्यासाठी त्याने सोशल मीडियावर अनेक गोष्टी सांगितल्या. औषधांप्रमाणे, बनावट आणि कालबाह्य झालेले पूरक आहार अशा प्रकारे विकणे हा तितकाच मोठा गुन्हा आहे. त्यामुळे मी समाज माध्यमावर त्याच्याविरोधात लिहले. आता त्याची रीतसर तक्रारही करणार असल्याचे साहिल खानने स्पष्ट केले.
मनोजच्या आरोपानुसार, एकदा साहिल देखील त्याच्या इमारतीखाली आला होता. यावर साहिल म्हणाला की, तो त्याच्या एका मित्राला त्याच इमारतीत भाडे तत्वावर घेण्यासाठी घर दाखवायला गेला होता. मनोजसह त्याच्या पत्नीच्या षड्यंत्राच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की , हा प्रश्न त्याच्या पत्नीला विचारला पाहिजे. तसेच मी त्यांना ओळखतही नसल्याचे साहिलने स्पष्ट केले. याचबरोबर साहिलने मनोजचा पासपोर्ट रद्द करण्याचा कट रचला होता का? हा आरोप साहिलने स्पष्टपणे फेटाळून लावला आहे.
यावेळी राज फौजदार यांनी देखील मनोजने कालबाह्य झालेले स्टिरॉइड्स विकल्यानंतर त्याला पैसे कसे परत केले नाही. त्याला शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप केला. या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार करून आपण आपली बाजू मांडणार असल्याचे साहिलने सांगितले. माझ्याकडे मनोजच्या विरोधात सर्व पुरावे असल्याचेही साहिल म्हणाला.