मुंबई -अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक (Nawab Malik Arrest) केल्यानंतर त्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून शांततापूर्वक आंदोलन (Mahavikas Aghadi Protest) करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणेच्या विरोधात तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते, नेते रस्त्यावर नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. मुंबई दादर पूर्वेकडील भाजप प्रदेश कार्यालयाबाहेरसुद्धा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil demand nawab malik resignation) यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक (Nawab Malik Arrest) केल्यानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Protest) सरकारच्या नेत्यांकडून ईडीच्या आणि केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले. मंत्रालयाच्या परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बसून शांततेने केलेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या आंदोलनात केंद्र सरकार आणि ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून करण्यात आली. केंद्र सरकार राज्याच्या कारभारामध्ये केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून हस्तक्षेप करत आहे. नेत्यांना, मंत्र्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, याचा कडवट प्रतीकार येणाऱ्या काळामध्ये केला जाईल, असा इशारा महाविकासआघाडीकडून देण्यात आला आहे.
केंद्र सरकार आणि ईडीविरोधात घोषणाबाजी -
या आंदोलनात केंद्र सरकार आणि ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी कार्यकर्ते तसेच नेत्यांकडून करण्यात आली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि नवाब मलिक यांच्या कुटुंबातून त्यांची मुलगी नीलोफर मलिक आणि भाऊ कप्तान मलिक उपस्थित होते. तसेच यावेळी मंत्री मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. मात्र, शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई वगळता इतर मंत्री किंवा ज्येष्ठ नेते अनुपस्थित राहिल्याने शिवसेनेच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, उत्तर प्रदेशमधील नेत्यांचा दौरा आणि आंगणेवाडीची जत्रा असल्याने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मंडळी आणि मंत्री अनुपस्थित असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच तीस वर्ष जुनं प्रकरण बाहेर काढून त्यात नवाब मलिक यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही छगन भुजबळ यांनी आंदोलनादरम्यान केंद्र सरकारवर केला.
अन्यायपूर्वक कारवाई महाराष्ट्रात सहन केली जाणार नाही
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासूनच केंद्र सरकारकडून राज्य सरकारला टार्गेट केले जात आहे. ईडीकडून नवाब मलिक यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. चुकीच्या प्रकरणात नवाब मलिक यांना गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मलिकांना बदनाम करून अतिरेकी संघटनांशी त्यांचा संबंध गोवण्याचा प्रयत्न केला जातो. लोकांच्याही आता हे लक्षात आले आहे. अशी अन्यायपूर्वक कारवाई महाराष्ट्रात सहन केली जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी दिला.
आंदोलनात राष्ट्रवादीचे डझनभर मंत्री सहभागी -