मुंबई - सोमवारी विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीनंतर एक कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी समर्थक 22 आमदारांना सोबत घेत सुरत गाठले. शिवसेनेच्या अंतर्गत नाराजी नाट्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात ( Mahavikas Aghadi ) येऊन महाराष्ट्रात राजकीय भूकंप ( Political earthquake in Maharashtra ) होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील या सत्ता नाट्यावर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.
थोडी वाट पाहा -यावेळी माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, "सध्या राज्यपालांना कोरोना झाला आहे. त्यामुळे पुढे काय होईल यावर फार जास्त चर्चा करू नका. त्यांना आधी बरं होऊ द्या. मग पुढे काय करायचं ते ठरवता येईल. त्यांच्याकडे किती आमदार आहेत, आमच्याकडे किती आमदार आहेत या चर्चा नंतर करू. या चर्चा व्यर्थ आहेत त्यामुळे कोणीही फार घाई करू नका. थोडी वाट पहा सर्व चित्र लवकरच स्पष्ट होईल."
हेही वाचा -एकनाथ शिंदे समर्थक आमदारांच्या फोटोमागील सरकारचे गणित, पक्षांतर विरोधी कायद्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी अजूनही 5 आमदारांची गरज
सर्वजण परत येतील -"एकनाथ शिंदे कधी येतील काय करतील याचा जास्त विचार करू नका. माझं आज सकाळीच जवळपास एक तास त्यांच्याशी बोलणे झालय. आमची सविस्तर चर्चा झाली. ते माझे चांगले मित्र आहेत, सहकारी आहेत. आमची जवळपास 35 ते 40 वर्षांची मैत्री आहे. आम्ही सविस्तर बोललो. ते लवकरच सर्व आमदारांना घेऊन स्वगृही परत येतील. याची आम्हाला सर्व शिवसैनिकांना खात्री आहे." अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
'ते' सर्व शिवसेनेनेतच -"काही आमदार फुटले म्हणून शिवसेना संपत नाही. मागच्या ५६ वर्षात शिवसेनेने अनेकदा संकटातुन राखेतुन गरूड झेप घेतली आहे. कितीतरी दिग्गज नेते शिवसेनेला सोडून गेले काही समर्थक आमदारांनी घेऊन गेले पण यातून सुद्धा शिवसेना पुन्हा नव्याने वर आली आणि वाढली सुद्धा. आता जे आमदार महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, ते सर्व कट्टर शिवसैनिक आहेत. त्या सर्वांनी शिवसेनेच्या कठीण काळात पक्षाला साथ दिली आहे. त्यामुळे मला खात्री आहे, हे सर्व कुठेही जाणार नाही ते शिवसेनेत आहेत. शिवसेनेत राहतील. शिवसेनेतच त्यांचे सर्व काही होईल." असं देखील राऊत यांनी म्हटले आहे.
जंगलात भटकंती करून पुन्हा येतील -"माध्यमांमधून बातम्या चालले जातात. महाविकास आघाडीमधील नाराजी नाही. माझी आज सकाळीच स्वतः शरद पवार यांच्यासोबत फोनवर चर्चा झाली. आज संध्याकाळी पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक होईल. या बैठकीत काय तो निर्णय घेतला जाईल. काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल आम्ही सत्तेत आहोत. एकमेकांसोबत आहोत चर्चा सुरू आहेत. पुढे काय करायचे याचा निर्णय तीनही पक्षांचे पक्षश्रेष्ठीच एकत्र बसून घेत आहेत. त्यामुळे थोडा वेळ वाट पहा सर्व चित्रे लवकरच स्पष्ट होईल. सध्या शिवसेनेचे बंडखोर आमदार गुजरात मधून गुहाटीला गेले आहेत. त्यांना जाऊ दे तिकडे. तिकडे चांगले जंगल आहे. थोडी मोकळी हवा घेतील जंगलात भटकंती करतील आणि पुन्हा येतील.
हेही वाचा - Maharashtra Political Crisis : दुपारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक, तिन्ही पक्षाचे नेते राहणार उपस्थित