मुंबई - मागील सात दिवसापासून मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजप नेते आमदार आशिष शेलार आझाद मैदानात पोहोचले. व त्यांनी एसटी कामगारांच्या संपाला पाठिंबा देत राज्य सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.
दोन ओळींचा जीआर काढण्यासाठी इतका वेळ का ?
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आमची ओळख व्हायला पाहिजे ही साधी मागणी एसटी कामगारांची आहे. म्हणून एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी सरकारला एक वाक्याचा साधा जीआर काढायची गरज असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. आताचे सरकार हे मायावी सरकार आहे. मायावी राक्षसाप्रमाणे हे सरकार वागत आहे. साध्या शब्दांमध्ये सामान्य माणसाला बनवण्याचं काम हे सरकार करत आहे. शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं पण आता काय झालं ? हे बसतात दुसऱ्याबरोबर आणि सरकार बनवतात दुसऱ्याबरोबर, यांचे दाखवायचे दात दुसरे आणि खायचे दात दुसरे असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. एसटी कामगारांच्या साध्या मागणीवर विचार करायला सरकारला इतका वेळ का लागतो? आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून महाराष्ट्राची सेवा करणारा एसटी कामगार असतो व या कामगाराचा मला गर्व आहे असंही अशिष शेलार यांनी सांगितलं आहे.