मुंबई -राज्यभरातील 28 हजार ग्रामपंचायतीमधील संगणक परिचालक गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी या संगणक परिचालकांनी केली आहे. या आंदोलनाला आज विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी भेट दिली. दरम्यान, हे सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप करत, संगणक परिचालकांना मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचं आश्वासन, प्रवीण दरेकर यांनी संगणक परिचालकांना दिले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिलेल्या आदेशानुसार संगणक परिचालक यांना महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून नियुक्ती देण्याचा ठराव झाला होता. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि पुढे निवेदन देऊनही स्वतः मुख्यमंत्री होऊन एक वर्ष झाले तरी या प्रश्नाबाबत साधी बैठक सुद्धा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे हे सरकार असंवेदनशील आहे आणि दिलेला शब्द पाळत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आंदोलकांचे प्रश्न मांडू-
राज्यातील 28 हजार संगणक परिचालकांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. सहा हजार रुपयाच्या तुटपुंज्या पगारात काम करत आहेत. संगणक परिचालकांना आयटी महामंडळाकडून कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची साधी मागणी करत आहेत. मात्र यावर महाविकास आघाडी सरकार गप्प बसून आहे. या सरकारला संगणक परिचालकांची कसलीही काळजी नसल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
तसेच आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. फक्त राज्य सरकार आपले प्रतिनिधी पाठवून या आंदोलकांना खोटे आश्वासन देऊन वेळ काढूपणाचं काम करत आहे. आम्ही शिक्षकांच्या आणि संगणक परिचालकांनाच्या समस्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडू आणि याबद्दल सरकारला जाब विचारू वेळ प्रसंगी आम्ही अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा दरेकर यांनी दिला आहे.
हेही वाचा-BREAKING : मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ आढळली बेवारस कार, जिलेटीनच्या कांड्या सापडल्या