मुंबई - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स परिषदेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीएसटी प्रकरणी थेट केंद्र सरकारला दोषी ठरवले होते. यानंतर आज पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वस्तू व सेवाकरातील नुकसान भरपाईपोटी केंद्राकडून महाराष्ट्राला जूलै २०२० पर्यंत २२ हजार ५३४ कोटी रुपयांची थकबाकी येणे असल्याची माहिती दिली. यासह ही रक्कम वेळेवर न मिळता अशीच वाढत गेल्यास दोन वर्षात १ लाख कोटींवर जाईल, अशी भीती अर्थमंत्री अजित पवार यांनी आज ४१व्या वस्तू व सेवाकर (जीएसटी) परिषदेत व्यक्त केली.
'जीएसटीचा हिस्सा आणि थकबाकी राज्यांना वेळेत देणं, राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढणं ही जबाबदारी केंद्र सरकारने स्विकारली असल्यानं ते कर्तव्य पार पाडण्यासाठी केंद्रानेच कमी व्याजदराने कर्ज घेऊन राज्यांना निधी उपलब्ध करावा.' अशी थेट मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जीएसटी परिषदेत केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ४१ व्या जीएसटी परिषदेत राज्याच्या वतीने अर्थमंत्री नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते. मंत्रालयातील त्यांच्या दालनातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे परिषदेत सहभागी होताना त्यांनी राज्याची बाजू मांडली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जीएसटीतील नुकसान भरपाईची रक्कम केंद्र सरकारकडून वेळेवर मिळत नाही, त्यामुळे सर्वच राज्यांसमोर आर्थिक संकट आहे. त्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे.
हेही वाचा -आवाजावरून कोरोना चाचणी..! मुंबईत १ सप्टेंबरपासून अभ्यास, अहवालानंतर वापर
'देशातील जवळपास सगळी राज्ये सध्या कोरोना संकटाशी लढत असल्याने केंद्राकडून अधिक निधी मिळालाच पाहिजे. केंद्रानं महसुल गॅरन्टी घेतली असल्यानं राज्यांना भरपाईचा निधी वेळेवर देणं ही केंद्राची जबाबदारी आहे. केंद्रानं त्यासाठी कर्ज घ्यावे, कारण त्यांना राज्यांपेक्षा कमी दराने कर्ज उपलब्ध होऊ शकते.' असे मतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीएसटी परिषदेत व्यक्त केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रासह अन्य राज्यांची बाजू मांडताना स्पष्ट केले की, आर्थिक मर्यादांमुळे राज्यांना कर्ज घेणे शक्य नाही. केंद्र सरकारला अल्पदरात कर्ज उपलब्ध होऊ शकते, ती सोय राज्य सरकारांना नाही. राज्यांनी जादा व्याजदराने कर्ज घेतल्यास त्याचा अकारण सेसवर परिणाम होईल व अंतिम बोजा ग्राहकांवर पडेल. राज्यांनी खुल्या बाजारातून कर्ज घेण्याचा प्रयत्न केल्यास तिथेही व्याजदर वाढण्याची व कर्ज मिळणं दुरापास्त होण्याची भीती आहे. ही वस्तुस्थिती असल्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी जीएसटी परिषदेत लक्षात आणून दिले.