मुंबई- सामान्य नागरिकांच्या तक्रारी अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्यात दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा (Seva Pandharvada ) आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधत या पंधरवड्यामध्ये नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. या पंधरवड्याच्या अंमलबजावणीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळ बैठक ( Maharashtra Cabinet Meet ) संपल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
स्थानिक पातळीवर समस्यांचा व्हावा निपटारा : ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या कामांसाठी मंत्रालयापर्यंत येण्याची आवश्यकता पडू नये यासाठी स्थानिक पातळीवर समस्यांचा निपटारा व्हावा. नागरिकांना प्रशासनाकडून सुशासनाचा अनुभव यावा त्यांची कामे गतीने आणि पारदर्शकपणे व्हावीत यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकतीच सुशासन नियमावली समितीची बैठकही घेतली होती. त्याचबरोबर विभागीय स्तरावरील मुख्यमंत्री सचिवालयाचे काम अधिक गतिमान करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते.
सेवा पंधरवड्यात होणार तक्रारींचा निपटारा :सामान्य नागरिकांचे प्रलंबित अर्ज, तक्रारी यांचा निपटारा व्हावा यासाठी हा सेवा पंधरवडा राबविण्याचा निर्णय झाला. या सेवा पंधरवड्यात आपले सरकार, महावितरण, डी.बी.टी., नागरी सेवा केंद्र, विभागांचे स्वत:चे पोर्टल अशा वेबपोर्टलवर दि. १० सप्टेंबर २०२२ पर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींचा निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मदत आणि पुनर्वसन, कृषी, महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्राम विकास, नगर विकास, आरोग्य, पाणी पुरवठा, महावितरण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागातील सेवांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा होऊन निर्णय घेण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले .