मुंबई - महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज (1 मे) ६० वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यामुळे वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.
ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्प वाहून अभिवादन केले.
हेही वाचा....विधीमंडळाच्या रिक्त जागांसाठी निवडणूक घ्या, शिवसेनेच्या शिष्टमंडळाचे राज्यपालांना पत्र
महाराष्ट्र दिनानिमित्त या ध्वजारोहण समारंभाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक तसेच वरिष्ठ शासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी अतिशय काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे प्रथमच मंत्रालयात झालेला हा ध्वजारोहण कार्यक्रम साधेपणाने पण उत्साहात साजरा झाला. मुख्यमंत्री हे स्वतः वाहन चालवित हुतात्मा स्मारक आणि मंत्रालयातील कार्यक्रमासाठी पोहचले होते.