मुंबई - देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत होते. मात्र, राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे नवीन बाधित रुग्णांच्या संख्येत घट तर बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. मागील चार आठवडयातील रुग्णसंख्येचे विश्लेषण केले असता नवीन बाधित रुग्णांमध्ये ४० टक्क्यांनी घट तर बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
राज्यात आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे मागील ४ आठवड्यातील विश्लेषण केले असता, दर आठवडयाला नव्याने आढळणारे बाधित रुग्ण कमी होताना दिसत आहेत. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडयात १ लाख ५३ हजार ३३१ एवढे नवे रुग्ण आढळले होते. त्यांची संख्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडयात ९२ हजार २४६ एवढी आहे. याचा अर्थ रुग्ण संख्येत जवळपास ४० टक्के घट झाली आहे. १० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या काळात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात ७०.७२ टक्क्यांवरुन ८२.७६ टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली आहे. तसेच प्रयोगशाळा नमुन्यांमधील पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण हे २४.६ टक्क्यांवरुन १५.०६ टक्क्यांवर आले आहे.
हेही वाचा -'मंदिरे सुरू करा म्हणायला तुम्हाला काय? जबाबदारी आमच्यावर आहे...'
मागील चार आठवड्यात प्रयोगशाळा तपासणीत थोडी घट होताना दिसत आहे. याची दोन प्रमुख कारणे आहेत, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दैनंदिन स्वरुपात कमी होत असल्याने बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची संख्या कमी होत आहे आणि फिवर क्लिनिक मध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील कमी होत असल्याचे निरीक्षण रुग्णालयांनी नोंदविले आहे. १० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत प्रतिदिन चाचण्यांची संख्या ८० हजारांच्या घरात आहे. परिणामी १० सप्टेंबर रोजी असणारा पॉझीटिव्हीटी दर हा २४.६० टक्क्यांवरून १० ऑक्टोबर रोजी १५.०६ टक्क्यावर आला असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६,४३,५८४ नमुन्यांपैकी १५,२८,२२६ म्हणजेच १९.९९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा १५,२८,२२६ असून ४०,३४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.८६ टक्के तर मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. सध्या २,२१,१७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात २३,१०,७८३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २४ हजार ७२६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
हेही वाचा -खडसे जळगावात परतले, राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मात्र मौन बाळगून